Solapur ATM Robbery News : सोलापूर शहरातील घरकुल परिसरातून चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच चोरी करून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.सग्गम नगर भागात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.चोरट्यांच्या या करारनाम्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,चोरट्यांनी चारचाकी वाहनाच्या मदतीने एटीएम मशीनला दोरखंड बांधून ते बाहेर ओढले आणि मशीनसह पसार झाले.संपूर्ण प्रकार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी (MIDC) पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी एटीएम सेंटरमधील दोन अंतर्गत आणि बाहेरील एक अशा तीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतलं आहे. त्याआधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.दरम्यान,चोरीला गेलेल्या एटीएम मशीनमध्ये किती रक्कम होती,याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
नक्की वाचा >> NEET पेपरफुटीचं लातूर-पुणे कनेक्शन नेमकं काय? पी.व्ही.कुलकर्णी खरा मास्टरमाईंड? वाचा INSIDE STORY
शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
बँकेच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे.आता थेट बँकेच्या एटीएमवरच चोरट्यांनी डल्ला मारल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र झाली आहे. आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी,अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.