पुण्यातील चाकण परिसरात हॉटेलमध्ये घुसून मालकावर बेधुंद गोळीबार करण्यात आलाय. चाकण परिसरातील रासेमध्ये 'मराठा' हॉटेलचे मालक स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने शिंदे या हल्ल्यात बचावले. सोमवारी (18 मार्च) रोजी रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडली.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील शिंदेच्या मालकीचे हे मराठा हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास तीन जण आले आणि त्यांनी शिंदे यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात शिंदे किरकोळ जखमी झाले. या प्रकरणात राहुल पवार, अजय गायकवाड आणि अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील अजय गायकवाडला अटक करण्यात आली असून अन्य दोघांचा तपास सुरु आहे.
राहुल पवारच्या भावाची चार महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात स्वप्नीलनं मदत केल्याचा संशय आरोपींना होता. त्यामधून हा गोळीबार झाला आहे. स्वप्नील शिंदे देखील सराईत गुन्हेगार असल्याची माहीती चाकण पोलिसांनी दिलीय.