Pune News: जवानाच्या अपघाती मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना अपयश; त्या 'दोन नोंदीं'नी वाढवला संताप

Pune News: तळेगाव दाभाडे पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे एका कर्तव्यदक्ष जवान प्रशांत कदम यांच्या कुटुंबाला भीषण मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune News: पोलिसांच्या या कारभारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पिंपरी चिंचवड:

सुरज कसबे, प्रतिनिधी

Pune News: तळेगाव दाभाडे पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे एका कर्तव्यदक्ष जवान प्रशांत कदम यांच्या कुटुंबाला भीषण मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. एकाच पोलीस ठाण्यात जवान बेपत्ता असल्याची तक्रार आणि त्याच वेळी एका अनोळखी मृतदेहाची नोंद असूनही, पोलिसांना या दोन्ही घटनांचा संबंध जोडता आला नाही. पोलिसांच्या या कारभारामुळे जवानाच्या मृत्यूची माहिती मिळण्यास विलंब झाला असून स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

काय आहे प्रकरण?

गुजरातच्या गांधीनगर येथे सीआरपीएफमध्ये कार्यरत असलेले जवान प्रशांत कदम हे 25 मार्च रोजी ड्युटीवर जाण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. मात्र, त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला आणि फोनही बंद झाला. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची रीतसर तक्रार दाखल केली होती. 

Advertisement

प्रत्यक्षात 25 मार्च रोजी रात्री सोमाटणे फाटा येथील हॉटेल अंगणसमोर रस्ता ओलांडताना एका अज्ञात वाहनाने कदम यांना जोराची धडक दिली होती. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

( नक्की वाचा : Vasai Crime: वसईच्या भोंदूबाबाची आरोपीच्या नवऱ्यासोबत झाली होती खास बैठक, वाचा नवं धक्कादायक वळण )

पोलीस ठाण्यातील समन्वयाचा अभाव

धक्कादायक बाब अशी की, तळेगाव पोलिसांनी या अपघाताची नोंद अनोळखी मृतदेह म्हणून केली होती. नियमानुसार, बेपत्ता व्यक्तीची तक्रार आणि मिळालेला अनोळखी मृतदेह यांची पडताळणी करणे हे पोलिसांचे प्राथमिक कर्तव्य होते. 

मात्र, दोन ते तीन दिवस उलटूनही पोलिसांना ही तफावत ओळखता आली नाही. एकाच पोलीस ठाण्यात दोन्ही नोंदी असतानाही तपास यंत्रणेला याचा सुगावा का लागला नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

( नक्की वाचा : Kalyan: 80 जणांना चावा, खंडणीची मागणी अन् कुत्र्याची हत्या! कल्याणच्या हाय प्रोफाईल सोसायटीत नेमकं चाललंय काय? )

मित्रांच्या शोधामुळे उघड झाले सत्य

पोलिसांकडून कोणतीही ठोस माहिती मिळत नसल्याने अखेर प्रशांत कदम यांच्या मित्रांनी स्वतः शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच प्रशांत कदम यांचा मृतदेह वायसीएम रुग्णालयात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांऐवजी मित्रांकडून ही माहिती मिळाल्याने कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांच्या या हलगर्जीपणामुळे जवानाच्या पार्थिवाचा शोध घेण्यास विलंब झाला, ज्याचा मोठा फटका त्यांच्या नातेवाईकांना बसला आहे.

Advertisement

जवान प्रशांत कदम यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे, मात्र पोलिसांच्या कारभारामुळे या दुःखात संतापाची भर पडली आहे. एका बाजूला जवान बेपत्ता असल्याची फाईल समोर असताना आणि दुसऱ्या बाजूला त्याच पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद असतानाही पोलिसांचे लक्ष का गेले नाही, असा सवाल विचारला जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे तळेगाव दाभाडे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
 

Topics mentioned in this article