Soldier death : आंध्र प्रदेशाच्या विशाखापट्टनममधील दुव्वाडा रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी एक खळबळ उडवून देणारी घटना घडली. येथे सेवेवर असलेल्या एका जवानाने धावत्या ट्रेनच्या समोर उडी मारून आत्महत्या केली. यामध्ये जवानाचा मृत्यू झाला आहे. नीलमपु वेंकट रेड्डी असं या जवानाचं नाव आहे. तो विशाखापट्टनमच्या पेडागांटयाडाचा निवासी आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. व्हिडिओमध्ये स्वच्छ दिसतंय की, ट्रेन येण्यापूर्वी नीलमपु वेंकट रेड्डी रेल्वेच्या ट्रॅकवर उतरून खाली झोपतो आणि यानंतर त्याच्या अंगावरुन ट्रेन पुढे जाते.
जवान रेल्वेच्या ट्रॅकवर झोपला अन् ...
रेल्वे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरुन ट्रेन जात होती, तेथेच हा धक्कादायक प्रकार घडला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वेंकट रेड्डीने अचानक आपलं डोकं ट्रेनच्या चाकांखाली ठेवलं. ट्रेन त्याच्या अंगावरुन जात होती आणि यात जवानाचा जागीच मृत्यू झाला. स्टेशनवरील प्रवाशांना हे दृश्य पाहून धक्काच बसला.
आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही...
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टम आणि अन्य कायदेशीर प्रक्रियेसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
प्राथमिक तपासात आत्महत्येमागील नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून मृत जवानाचे नातेवाईक आणि मित्रांकडून चौकशी केली जात आहे. जवानाने आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहिली होती का, याचाही तपास घेतला जात आहे. अद्याप पोलिसांकडून कोणतीही अतिरिक्त माहिती देण्यात आलेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
