प्रशांत जव्हेरी, प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल भागांमध्ये शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचं सरकारचे प्रयत्न असले तरी प्रत्यक्षात अद्यापही अनेक विद्यार्थी जीव धोक्यात घालून शिक्षणासाठी प्रवास करत असल्याचे चित्र समोर येत आहे. मोलगी गावातील ही घटना त्याचे जिवंत उदाहरण ठरत आहे.
जळगावातील चाळीसगाव तालुक्यातील नायडोंगरी येथील आदिवासी आश्रमशाळेत शिक्षण घेणारे 40 विद्यार्थी मुले आणि मुली अक्षरश: मालवाहू ट्रकने शाळेत जाताना दिसून आले. गुरं- मेंढ्यांप्रमाणे वाहनात भरलेले विद्यार्थी कोणत्याही सुरक्षाविना प्रवास करत होते. ही बाब अत्यंत गंभीर व धक्कादायक आहे. या प्रकारातून शासनाच्या सर्वांगीण शिक्षणाचा दावा फोल ठरताना दिसतो. दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी किती कठीण परिस्थितीला तोंड देतात हे यावरून स्पष्ट होते.
नक्की वाचा - Shocking news: मुलाला मुलीसारखे सजवले, पती पत्नीनेनंतर भयंकर पाऊल उचलले, धक्कादायक खुलासा
विशेष म्हणजे वाहन चालक किंवा आश्रमशाळा प्रशासनाने कोणतीही सुरक्षितता न बाळगता केवळ मालवाहू ट्रकमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. आदिवासी विकास विभाग शिक्षण विभाग आणि वाहतूक प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. विशेषत आदिवासी विकास मंत्री यांनी या गंभीर प्रकाराची दखल घ्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी होत आहे. दुर्गम भागात शिक्षणाची ग्वाही देणाऱ्या शासनाच्या योजना जर प्रत्यक्षात अशा धोकादायक प्रकारांमध्ये रूपांतरित होत असतील तर आदिवासी विद्यार्थ्यांचे आयुष्य आणि शिक्षण दोन्ही धोक्यात येते.