BMC Robbery News Today : मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात चोरीची घटना झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना (UBT) नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या पर्समधील वीस हजार रूपये सभागृहातच चोरीला गेल्याची घटना घडली. स्थायी समिती सभागृहात चोरीचा हा पहिलाच प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची माहिती महापौर, विरोधी पक्ष आणि स्थायी समिती सदस्यांनाही देण्यात आली आहे. सभागृहात सीसीटीव्ही नसल्याने या घटनेची खात्री करणे कठीण झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बैठक संपल्यानंतर भाटिया जेवणासाठी बाहेर गेल्या होत्या. त्या परत आल्यावर त्यांनी पर्स उघडली.पण पर्समध्ये पैसे नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर या घटनेची माहिती एमएस विभाग,सुरक्षा विभाग आणि पोलिसांना देण्यात आली.तसच महापौर,विरोधी पक्ष आणि स्थायी समिती सदस्यांनाही कळवण्यात आलं आहे.
लक्ष्मी भाटिया नेमकं काय म्हणाल्या?
“स्थायी समिती म्हणजे महापालिकेची तिजोरी मानली जाते.याच ठिकाणी असा प्रकार होत असेल, तर सुरक्षेबद्दल काय म्हणायचं?”असा संतप्त सवाल लक्ष्मी भाटिया यांनी उपस्थित केला.दरम्यान,मनसे गटप्रमुख यशवंत किल्लेदार यांनीही या घटनेवरून पालिकेला खडेबोल सुनावले.“सभागृहातच सुरक्षेची अवस्था अशी असेल,तर सामान्य मुंबईकरांच्या सुरक्षेचे काय?” असा टोला लगावला.
नक्की वाचा >> Pune News: पुणे हादरलं! आंब्याचं आमिष दाखवून चिमुकलीला रुममध्ये बोलावलं, नंतर घडला संतापजनक प्रकार
स्थायी समिती सभागृहात सीसीटीव्ही नाही
लक्ष्मी भाटीया वार्ड क्रमांक 56 च्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत.या प्रकारामुळे पालिका भवनातील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.स्थायी समिती सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पैसे कोणी घेतले यांचा शोध लावणे कठीण बनलं आहे.