रिझवान शेख, प्रतिनिधी
Thane Crime News : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात कर्तव्य बजावत असलेल्या एनडीपीएस विभागातील पोलीस कर्मचारी सचिन पाटील यांच्यावर जोरदार हल्ला झाला. बुलेटवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांना जबर मारहाण केली. या हल्ल्यात पाटील यांच्या कानातून रक्तस्त्राव झाल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं होतं.परंतु, त्यांना नोटीस देऊन सोडलं,अशी माहिती समोर आली आहे.
मुंब्रा येथे कार्यरत असलेले एनडीपीएस पथकातील पोलीस कर्मचारी सचिन पाटील आणि पोलीस हवालदार माळी हे नोटीस बजावण्यासाठी परिसरात गेले होते.काम आटोपून परत येत असताना वाय-जंक्शन परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. परिस्थितीनुसार दोन्ही पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रण करत होते.याच दरम्यान बुलेट मोटारसायकलवरून दोन जण विरुद्ध दिशेने येत होते. सचिन पाटील यांनी त्यांना अडवले आणि योग्य दिशेनं जाण्याचा सल्ला दिला.त्यानंतर त्या दोघांनी पोलिसांसोबत वाद घातला आणि त्यांना शिविगाळ केली.
नक्की वाचा >> WhatsApp New Rule : ...तरच तुमच्या मोबाईलमध्ये सुरु राहणार WhatsApp, सरकारचा नवा नियम वाचलात का?
पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं पण नंतर..
आपण स्वत: पोलीस असल्याचं पाटील यांनी त्यांना सांगितलं होतं.तरीही त्या तरुणांनी पाटील यांना मारहाण केली. बुलेटवर मागे बसलेल्या एका व्यक्तीने पाटील यांच्या कानावर हल्ला केला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं. पण त्यांना नोटिस देऊन सोडून दिलं, अशी माहिती सचिन पाटील यांनी दिली आहे. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पुन्हा जावे लागणार असल्याचंही ते म्हणाले.या घटनेमुळे पोलीस दलात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास सुरू आहे.