Ulhasnagar News : तुम्ही अडचणीत आहात, तुम्हाला संकट दूर करायचे आहे आणि तुमची आर्थिक चणचण संपवायची आहे... यासाठी 'बागेश्वर बाबांची' पूजा करावी लागेल, असे सांगून एका 70 वर्षांच्या आजीचा विश्वास जिंकला गेला आणि त्यांना तब्बल 24 लाख रुपयांना फसवण्यात आले. आधी फ्लॅटचे आमिष, नंतर दागिन्यांची लूट आणि शेवटी 'बाबां'च्या पूजेचे नाटक करत वयोवृद्ध आजीला गंडा घालणाऱ्या 5 आरोपींना उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
उल्हासनगर परिसरातील विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 70 वर्षांच्या शकुंतला आहूजा यांच्यासोबत हा प्रकार घडला. आहूजा यांच्या घरी रेखा नावाची मोलकरीण कामाला होती. 2023 मध्ये, याच मोलकरणीने तिची ओळख करिष्मा दुधानी नावाच्या महिलेशी करून दिली.
सुरुवातीला करिष्माने आजीबाईंकडून उसनवारीवर काही रक्कम घेतली आणि ती परत करून त्यांचा विश्वास संपादन केला. एकदा विश्वास बसल्यानंतर, करिष्मा दुधानी आणि तिच्या चार साथीदारांनी आजीबाईंना मोठी आमिषे दाखवायला सुरुवात केली.
( नक्की वाचा : Dombivli News: निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीत मोठा शस्त्रसाठा जप्त, राजकीय गुन्हेगाराला बेड्या )
फ्लॅटच्या नावाखाली 10 लाख रुपये घेतले
या आरोपींनी आजीबाईंना सांगितले की, 25 लाख रुपये किमतीचा फ्लॅट त्यांना केवळ 10 लाख रुपयेमध्ये मिळवून दिला जाईल. हे आमिष दाखवून करिष्मा आणि तिच्या ओळखीच्या चौघांनी शकुंतला आहूजा यांच्याकडून सुरुवातीला 10 लाख रुपये उकळले.
मात्र, आरोपींनी आजीबाईंना फ्लॅट दिला नाही आणि पैसेही परत केले नाहीत. 'कामासाठी खर्च झाले' असे खोटे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. यामुळे आजीबाईंना मोठा धक्का बसला.
'बागेश्वर बाबां'च्या पूजेचे नाटक...
फ्लॅटच्या फसवणुकीनंतर, या पाच जणांनी मिळून आजीबाईंना सांगितले की, 'तुम्ही मोठ्या संकटात आहात. हे संकट आणि तुमची आर्थिक चणचण दूर करण्यासाठी तुम्हाला बागेश्वर बाबा यांची विशेष पूजा करावी लागेल.'
यासाठी त्यांनी एका व्यक्तीशी आजीबाईंचे बोलणे करून दिले, जो स्वतः 'बागेश्वर बाबा' असल्याचे भासवत होता. या पूजेच्या नावाखाली तसेच इतर विविध कारणे देत आरोपींनी आजीबाईंकडील सुमारे 14 लाख रुपये किमतीचे दागिने काढून घेतले. अशा प्रकारे, आरोपींनी दोन वर्षांत वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून आजीबाईंना एकूण 24 लाख रुपये (रोख आणि दागिने मिळून) चा गंडा घातला.
आरोपींना अटक
या संपूर्ण प्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, शकुंतला आहूजा यांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला आणि आजीबाईंना गंडा घालणाऱ्या पाच आरोपींना अटक केली.
करिष्मा दुधानी, साहिल दुधानी, उषा शर्मा, यश शर्मा, आणि लविना शर्मा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी आत्तापर्यंत 7 लाख रुपये हस्तगत केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरू आहे.