जाहिरात

Dombivli News: निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीत मोठा शस्त्रसाठा जप्त, राजकीय गुन्हेगाराला बेड्या

Dombivli News: डोंबिवली पूर्वेकडील देसले पाडा येथील गोकुळधाम टॉवर या इमारतीत सापळा रचण्यात आला. हा आरोपी याच इमारतीत राहत होता.

Dombivli News: निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीत मोठा शस्त्रसाठा जप्त, राजकीय गुन्हेगाराला बेड्या
Dombivli News: पोलिसांनी आरोपीच्या घरी छापा टाकला आणि त्याला रंगेहाथ बेड्या ठोकल्या.
डोंबिवली:

Dombivli News: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज असलेल्या कल्याण क्राईम ब्रँचने एक मोठी आणि महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. घातक शस्त्रांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी डोंबिवलीतून अटक केली आहे. त्याच्याकडून 3 गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि तलवारींसारखा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

सराईत गुन्हेगार जेरबंद

कल्याण क्राईम ब्रँचने अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव रोशन झा असे आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, रोशन झा हा गावठी बनावटीचे पिस्तूल आणि इतर घातक शस्त्रे विक्रीसाठी घेऊन आला होता. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना ही माहिती मिळाली होती.

त्या माहितीच्या आधारे, क्राईम ब्रँचच्या पथकातील पोलीस अधिकारी सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली पूर्वेकडील देसले पाडा येथील गोकुळधाम टॉवर या इमारतीत सापळा रचण्यात आला. हा आरोपी याच इमारतीत राहत असल्याची माहिती पोलिसांना असल्याने, पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला आणि त्याला रंगेहाथ बेड्या ठोकल्या.

( नक्की वाचा : Kalyan News: मराठी येत नाही म्हणून खाणावळीत धुडगूस; कल्याणमध्ये तरुणांचे भयानक कृत्य, मराठी व्यावसायिकाचा टाहो )
 

 'राजकीय आश्रय' असल्याचा संशय

या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपी रोशन झा याच्याकडून मोठा आणि धोकादायक शस्त्रसाठा जप्त केला आहे. यामध्ये प्रामुख्याने 3 गावठी पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे, 2 मॅक्झिन, 1 खंजीर, 2 चाकू आणि 2 तलवारींचा समावेश आहे.

रोशन झा हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी उल्हासनगरमधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 7 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, रोशन झा याला काही स्थानिक राजकीय नेत्यांचा आश्रय असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे या कारवाईला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

( नक्की वाचा : Maharashtra Local Body Elections: 246 नगर परिषदा, 42 नगर पंचायतींसाठी मतदान 2 डिसेंबरला; वाचा A to Z माहिती )
 

आरोपी रोशन झा याने हा शस्त्रसाठा कुठून आणला? निवडणुकीच्या तोंडावर तो ही शस्त्रे नेमकी कोणाला विकणार होता? आणि यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे? या सर्व बाबींचा तपास आता कल्याण क्राईम ब्रँचचे पथक करत आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com