निनाद करमारकर, उल्हासनगर: एका ग्राहकाने आधी हॉटेलच्या रूममधील पलंग तोडला. त्यावर हॉटेल मालकाने त्याला हॉटेलमधून निघून जाण्यास सांगितल्याने त्याला राग आला आणि याच रागातून त्याने साथीदारांच्या मदतीने हॉटेल मालकाला मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबबत सविस्तर माहिती अशी की, उल्हासनगर कॅम्प 3 मधील चोपडा कोर्ट परिसरात केके रॉयल रेसिडेन्सी नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये भारत साळवे यांनी रूम घेतली होती. त्यांच्याकडून हॉटेलमधील पलंग तुटल्याने हॉटेल मालक जितू चैनानी यांनी त्यांच्याकडून कोणतीही नुकसानभरपाई न घेता त्यांना रूम सोडायला सांगितलं.
मात्र याचा राग आल्याने भारत साळवे याने जगदीश खैरनार आणि अन्य साथीदारांना घेऊन हॉटेल मालक जितू चैनानी यांना फरपटत बाहेर आणून बेदम मारहाण केली. या मारहाणीत जितू चैनानी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोळ्यावर, नाकावर इजा झाल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे.
( नक्की वाचा : SSC Result Maharashtra Board : लातूरमधील विद्यार्थ्यांची झिरो ते हिरो कामगिरी, दहावीच्या निकालानंतर होतेय चर्चा )
बदलापूरात पर्यटकांना लुटले...
दुसरीकडे, बदलापुरातल्या उल्हास नदीकिनारी चोरट्यांचा अक्षरशः सुळसुळाट झालाय. या चोरट्यांनी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची कार फोडत एक लाखाचा ऐवज लंपास केलाय. दरम्यान, यानंतर पोलिसांनी योग्य सहकार्य न केल्याचा आरोप पर्यटकांनी केला आहे. रविवारची सुट्टी असल्यामुळे उल्हासनगरातील काही पर्यटक आपल्या मित्रांसोबत बदलापूरच्या बॅरेज धरणालगत उल्हास नदीत पोहण्यासाठी आले होते.
त्यांनी आपली कार रस्त्यावर लावली आणि ते पोहण्यासाठी नदीत उतरले. हीच संधी साधत काही चोरट्यांनी कटावणी आणि पान्ह्याने त्यांच्या कारचा दरवाजा उचकटला आणि कारमधील दोन मोबाईल फोन, लॅपटॉप, ऑडिओ सिस्टम तसंच जवळपास 27 हजार रुपयांची कॅश चोरली. कारच्या वायर कापून त्यांनी कार चोरण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी या पर्यटकांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी चोरट्यांना पकडण्याऐवजी तुम्ही नदीत पोहायलाच का गेलात? असा जाब विचारत आपल्यालाच दोषी ठरवल्याचा आरोप या पर्यटकांनी केला आहे.