अमजद खान
उल्हासनगरमधील प्री स्कूलमधील एका चिमुकल्याला मारहाण प्रकरणात शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात मनसे आक्रमक झाली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी शाळेच्या बाहेर आंदोलन करत शाळेचा बॅनर फाडला आहे. संबंधित शिक्षीकेला लवकरात लवकरअटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता चिघळण्याची शक्यता आहे. उल्हासनगरात एक्सलंट किडवर्ल्ड या शाळेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले.
या व्हिडिओत कविता शिकविता एक चिमुकला टाळ्या वाजवत नव्हता. त्या कारणावरुन शिक्षिकेने त्याला मारहाण केली. या एक मिनीटांच्या व्हिडिओत शिक्षीका त्याच्या गालावर चार चापट मारताना दिसत आहे. शेवटी तो चिमुकला तिला प्रतिकार करतो. तिचा हात पकडतो. ही बातमी एनडीटीव्हीने दाखविल्यानंतर संबंधित शिक्षिका गायत्री पात्रा हिच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विठ्ठलवाडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली आहे.
हा संपूर्ण प्रकार उजेडात आल्यानंतर सोमवारी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. मनसे पदाधिकारी बंडू देशमुख यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्त्यांनी शाळेच्या बाहेर गोंधळ घातला. शाळेच्या बॅनर फाडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानतंर मनसे कार्यकर्तांना बाजूला केले. या प्रकरणात मनसेचे पदाधिकाऱ्यांनी पोलिसाना एक निवेदन दिले आहे. संबंधित शिक्षिकेला लवकरात लवकर अटक करुन दोषींच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत शाळा प्रशासनाला जाब विचारला आहे.
मनसे कार्यकर्त्यांनी तीन मागण्या केल्या आहेत. त्यात शाळेतील कर्मचारी आणि शिक्षकांचे पोलिस व्हेरीफिकेशन करावे.त्यांची मानसिक चाचणी झाली पाहिजे आणि शाळेच्या सर्व रुममध्ये सीसीटीव्हीत हवेत अशा मागण्याचे निवेदन ही मनसे पदाधिकारी बंडू देशमुख यांनी दिले. या प्रकरणी शाळा प्रशासनाशी संपर्क साधला असता शाळा प्रशासनाकडून कोणी बोलण्यास तयार नव्हते. अशात आता शाळा प्रशासन यापुढे अशा घटना होवू नये यासाठी काय उपाय योजना करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.