
Ulhasnagar News : मुलांना शाळेत होणारी शिक्षा योग्य की अयोग्य या विषयावर अनेकदा चर्चा केली जाते. पण, मुलांना विनाकारण आणि अतिरेकी शिक्षा करु नये यावर सर्वांचं एकमत असायला हवं. पण, दुर्दैवानं अनेकदा तसं होत नाही. शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिक्षा ही काळजीचा विषय आहे. असाच एक धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये उघड झालाय.
उल्हासनगरमधील एका 'प्री-स्कूल'मध्ये इंग्रजी कविता शिकवताना एका चिमुकल्या विद्यार्थ्याने टाळ्या वाजवल्या नाहीत म्हणून एका शिक्षिकेने त्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
( नक्की वाचा : Dombivli : डोंबिवली हादरले: नमाजासाठी आलेल्या तरुणांना पोलिसांसमोरच मारहाण; शिंदे गटाच्या सरपंचावर आरोप )
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, 'एक्सीलेंट केडू वर्ल्ड' या प्री-स्कूलमधील शिक्षिका विद्यार्थ्याला इंग्रजी कविता शिकवत असताना त्याला टाळ्या वाजवायला सांगते. मात्र, विद्यार्थी टाळ्या वाजवत नसल्याने शिक्षिका त्याला 1-2 नव्हे, तर 3 वेळा मारहाण करताना दिसते. अखेरीस तो चिमुकला मुलगा शिक्षिकेचा हात धरून तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला. व्हिडिओची गंभीर दखल घेत उल्हासनगर पोलिसांनी तपास सुरू केला. विठ्ठलवाडी पोलिसांनी या प्रकरणी शिक्षिका गायत्री पात्रा यांच्या विरोधात 'बाल संरक्षण कायदा 75' (Juvenile Justice Act, Section 75) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world