Ulhasnagar News : उल्हासनगर कॅम्प क्रमांक ३ मधील पवई परिसरातील सरस्वती नगर येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जगदीश इमारतीजवळील परिसरात राहणारा अवघा ४ वर्षीय चिमुकला श्रावण रुपनारायण इमारतीखाली खेळत होता. त्याचवेळी अचानक चौथ्या मजल्यावरून एक जड लादी थेट त्याच्या डोक्यावर कोसळली. या भीषण अपघातात चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या तो कोमामध्ये असून मुंबईतील वाडिया येथे जीवन-मरणाची झुंज देत आहे.
वडिलांच्या निधनानंतर चिमुरड्यासोबत धक्कादायक घडलं
या दुर्दैवी घटनेमुळे चिमुकल्याची आजी रत्नाबाई गणेश नुपनारायण आणि संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे. काही महिन्यांपूर्वीच मुलाच्या वडिलांचे निधन झाले होते आणि कुटुंब त्या धक्क्यातून सावरत असतानाच हा आणखी एक मोठा आघात त्यांच्यावर कोसळला आहे. घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने मुलाला उल्हासनगर आणि कल्याणमधील रुग्णालयांत नेले, मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला मुंबईला रेफर केले.
वडिलांच्या निधनानंतर आता आयुष्याच्या अत्यंत कठीण टप्प्यातून जात असलेल्या या चिमुकल्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, प्रार्थना केली जात आहे.