Ulhasnagar News: पुरोगामी आणि सुधारणावादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला अत्यंत लाजवणाऱ्या आणि माणुसकीला पूर्णपणे काळीमा फासणाऱ्या एका भीषण अत्याचाराची घटना समोर आली आहे. कायद्याचे राज्य असलेल्या आपल्या देशात अजूनही काही ठिकाणी 'जात पंचायती'चा वरचश्मा कसा सुरू आहे, याचे सर्वात भयानक उदाहरण उल्हासनगर शहरात पाहायला मिळाले आहे. केवळ जात पंचायतीचा तुघलकी नियम धुडकावला म्हणून भरचौकात महिलांची दोन किलोमीटरपर्यंत दिंड काढण्यात आली, त्यांचे केस कापले गेले आणि गळ्यात चपलांचा हार घालून अमानुष मारहाण करण्यात आली.
या संपूर्ण प्रकारामुळे राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे, तर दुसरीकडे महिलांच्या सुरक्षिततेचा दावा करणाऱ्या पोलिसांच्या संशयास्पद कारभारावरही आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जात पंचायतीच्या एका फर्मानामुळे वाद पेटला
या अत्यंत धक्कादायक घटनेची पाळेमुळे विठ्ठलवाडी परिसरातील वाघेरी आणि राजपूत कुटुंबीयांमधील वादात दडलेली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक जात पंचायतीने राजपूत कुटुंबीयांवर बहिष्कार घालत त्यांना परिसरातील मंदिरात प्रवेश करण्यास मनाई केली होती. जात पंचायतीचा हा निर्णय अन्यायकारक आहे, आमचा काय दोष? असा सवाल करत राजपूत कुटुंबातील एक तरुण मंदिरात आयोजित भंडारा म्हणजेच महाप्रसादासाठी गेला.
जात पंचायतीचे फर्मान मोडून हा तरुण मंदिरात कसा आला, याच एका गोष्टीचा प्रचंड राग मनात धरून वाघेरी कुटुंबीयांनी थेट त्या तरुणाच्या घरावर हल्ला चढवला.
( नक्की वाचा : Dombivli News : डोंबिवलीत घरांच्या नावाखाली कोट्यवधींची लूट; संरक्षण खात्याच्या जमिनीवर बांधल्या चाळी, शेकडो.. )
दोन किलोमीटर दिंड, केस कापले आणि चपलांचा हार
गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास वाघेरी कुटुंबीयांनी राजपूत यांच्या घरावर जोरदार दगडफेक केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी घरातील महिलांना ओढत रस्त्यावर आणले. त्यानंतर जे घडले ते ऐकून कोणाचाही थरकाप उडेल. भररस्त्यात गीता प्रेम राजपूत, राज राजपूत, सुनील राजपूत आणि इतर महिलांचे केस कापण्यात आले. त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घालून, लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करत परिसरातून तब्बल 2 किलोमीटरपर्यंत त्यांची दिंड काढण्यात आली.
सर्वात संतापजनक बाब म्हणजे जेव्हा या महिलांवर रस्त्यावर अत्याचार सुरू होते, तेव्हा शेकडो नागरिक केवळ बघ्याची भूमिका घेऊन उभे होते. सध्या गंभीर जखमी झालेल्या या महिलांवर उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
( नक्की वाचा : Bermuda Triangle: बर्म्युडा ट्रँगलचं सर्वात मोठं गूढ उकललं? समुद्राच्या खाली शास्त्रज्ञांना सापडलं तरी काय? )
पोलिसांचा ढिसाळ कारभार; कलमांची फेरफार केल्याचा आरोप
इतकी अमानुष आणि गंभीर घटना घडूनही उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांचा कारभार अत्यंत संशयास्पद आणि ढिसाळ राहिल्याचे समोर आले आहे. ज्या जात पंचायतीच्या जाचाविरुद्ध आणि महिलांवरील अमानुष अत्याचाराविरुद्ध कठोर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल व्हायला हवे होते, तिथे पोलिसांनी कमालीची नरमाई दाखवल्याचा आरोप होत आहे.
पीडित कुटुंबाच्या मते, पोलिसांनी योग्य त्या कठोर कलमांखाली कारवाई केली नाही. या संपूर्ण घटनेत जुली वाघरी, मटकी वाघरी, विनू आगरी यांच्यासह एकूण 7 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, इतका मोठा गुन्हा असताना पोलिसांनी आतापर्यंत केवळ 2 आरोपींनाच अटक केली असून उर्वरित आरोपी मोकाट फिरत आहेत. पोलिसांच्या या भूमिकेमुळे संतप्त नागरिकांकडून आता थेट खाकी वर्दीच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.