उल्हासनगरात इंडियन ऑइलच्या पेट्रोलपंपावर हेराफेरी सुरू असल्याचा आरोप होत आहे. येथे एका ग्राहकाने 120 रुपयांचं पेट्रोल भरल्यानंतर त्याच्या गाडीतून फक्त अर्धा लिटर पेट्रोल निघालं. हे पाहून ग्राहकालाही धक्का बसला. दरम्यान पेट्रोल पंपाचा हा मोठा स्कॅम असल्याचा आरोप केला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उल्हासनगरच्या 17 सेक्शनकडून श्रीराम टॉकीजकडे जाताना हिराघाट भागात इंडियन ऑइलचा पेट्रोलपंप आहे. या पंपावर एक तरुण शनिवारी संध्याकाळी पेट्रोल भरण्यासाठी आला. त्याने 120 रुपयांचं पेट्रोल भरण्यास सांगितलं असता मीटर शून्यवरून थेट 60-70 रुपयांवर गेल्याचं त्याला दिसलं. त्यामुळं त्याने गाडी तिथेच उभी करून मॅनेजरला गाडीतील पेट्रोल बाटलीत काढून दाखवायला सांगितलं. त्यानंतर एका मेकॅनिकने त्याच्या टाकीतलं संपूर्ण पेट्रोल काढलं असता ते फक्त अर्धा लिटरच भरलं.
नक्की वाचा - Solapur News : बारावीचे चार पेपर दिले, सकाळी अंघोळीला बाथरूममध्ये गेला अन् दार उघडताच कुटुंब हादरलं!
त्यामुळं पेट्रोल भरताना हेराफेरी झाल्याचा आरोप ग्राहकाने केला आहे. त्यानंतर पेट्रोलपंपाच्या मालकाने या ग्राहकाकडे चूक कबूल करत हे प्रकरण वाढवू नका, असं म्हणत एक लिटर पेट्रोल मोफत देण्याची तयारी दर्शवली. मात्र ग्राहकाने पैसे देऊन पेट्रोल घेतलं. या सगळ्या प्रकाराचा संबंधित ग्राहकाने चित्रित केलेला व्हिडिओ समोर आला असून आता या पेट्रोलपंपावर कारवाईची मागणी केली जात आहे.