विशाल पाटील, प्रतिनिधी
Firing On Bjp leader In Kolhapur : कोल्हापूर शहरात भरदिवसा गोळीबाराची एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपचे स्थानिक कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात साखरे गंभीर जखमी झाले आहेत. खासगी सावकारीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे कोल्हापूर शहरात प्रचंड खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सूरज साखरे यांची प्रकृती चिंताजनक
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सूरज साखरे हे कोल्हापूर परिसरातील भाजपचे कार्यकर्ते आहेत. आज त्यांच्यावर अचानक गोळीबार करण्यात आला. गोळी लागल्याने साखरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
नक्की वाचा >> Dhule News: व्हिडीओ बनवून तापी नदीच्या पुलावरून तरुणाने मारली उडी, दोन दिवसांनी जे घडलं..
हल्ल्यामागचं कारण काय?
हा हल्ला पूर्ववैमनस्य किंवा खाजगी सावकारीच्या व्यवहारातील वादातून झाला असावा, अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे कोल्हापूरकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world