Vasai News : वसईतील नवजीवन परिसरातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका मासे विक्रेत्याने विक्रीसाठी ठेवलेल्या माशांवर चक्क झुरळ मारण्याचे लाल हिट फवारल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांच्या आरोग्याशी हा थेट खेळ असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, वसईच्या नवजीवन भागात एका मासे विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित विक्रेता त्याच्या विक्रीसाठी असलेल्या माशांवर आणि त्यांच्या आजूबाजूला लाल रंगाचे हिट स्प्रे फवारताना स्पष्टपणे दिसत आहे. भरदिवसा चाललेल्या या प्रकारामुळे अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
लाल हिट हे प्रामुख्याने झुरळांसारखे घातक कीटक मारण्यासाठी वापरले जाणारे विषारी रसायन आहे. याचा मानवी शरीराशी किंवा अन्नाशी संपर्क येणे अत्यंत धोक्याचे मानले जाते.
( नक्की वाचा : Doctor Suicide: मैत्री, प्रेम आणि नंतर छळ...फौझीलनं स्तुतीला टोकाचं पाऊल उचलण्यास कसं भाग पाडलं? मोठा खुलासा )
मात्र, माशांना कीकांपासून वाचवण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव अशा प्रकारे विषारी स्प्रेचा वापर करणे हे ग्राहकांच्या जीवावर बेतू शकते. या विक्रेत्याच्या कृत्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संताप असून अन्न प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता संबंधित विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशा प्रकारे उघड्यावर विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वसईकर करत आहेत.
( नक्की वाचा : KDMC News: कल्याण डोंबिवलीत महायुतीमध्ये संघर्ष पेटला, भाजपाच्या एका ठरावानं शिवसेनेची झोप उडवली! )
प्रशासनाकडून तातडीने कारवाईची मागणी
या धक्कादायक प्रकारामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. विषारी फवारणी केलेले मासे खाल्यास विषबाधा होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे संबंधित अन्न व औषध प्रशासनाने या परिसरात विक्री होणाऱ्या माशांची तपासणी करावी आणि अशा धोकादायक पद्धतीचा अवलंब करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात मोहीम उघडावी, असे आवाहन स्थानिक नागरिकांकडून केले जात आहे.
इथे पाहा संपूर्ण VIDEO