Vasai News : वसईत संताप! फक्त 5 मिनिटे उशीर, शिक्षिकेच्या क्रूर शिक्षेमुळे सहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू?

Vasai Student Death : वसई पूर्वेकडील सातिवली येथील श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेत एक धक्कादायक प्रकार झाल्याचा आरोप आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो
वसई:

मनोज सातवी, प्रतिनिधी

Vasai Student Death : वसई पूर्वेकडील सातिवली येथील श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेत एक धक्कादायक प्रकार झाल्याचा आरोप आहे. या शाळेत सहावीत शिकणाऱ्या 12 वर्षीय काजल गौंडच्या (Kajal Gaund) मृत्यूमुळे वसई परिसरात शोककळा आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेत येण्यास उशीर झाल्यामुळे एका महिला शिक्षिकेने काजलला अमानवी शिक्षा दिली. याच शिक्षेमुळे तिची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप काजलच्या कुटुंबियांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

याबाबत  मिळालेल्या माहितीनुसार, मागील शनिवारी (8 नोव्हेंबर 2025) काजल शाळेत काही मिनिटे उशिरा पोहोचली होती. केवळ याच क्षुल्लक कारणावरून संबंधित शिक्षिकेने तिला पाठीवर दप्तर असतानाच 100 पेक्षा जास्त उठाबशा काढायला लावल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. या शिक्षेनंतर काजलच्या पाठीमध्ये तसेच कंबरेच्या खालच्या भागात तीव्र वेदना सुरू झाल्या.

घरी गेल्यानंतरही काजलची प्रकृती अधिकच बिघडत गेली. त्यामुळे तिला तातडीने नालासोपारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक गंभीर झाल्यानंतर तिला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात  हलवण्यात आले. परंतु, दुर्दैवाने उपचारादरम्यान काजलने प्राण सोडला आणि सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.

( नक्की वाचा : Raigad News : 'आई कुठे आहेस तू?' हाक मारली अन् 4 वर्षांची मुलगी बेपत्ता, 48 तासानंतर मोठा ट्विस्ट )
 

या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पालकांनी शाळेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका शुल्लक कारणावरून शिक्षिकेने दिलेली ही शिक्षा अमानवी असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Advertisement

अनधिकृत शाळेचा मुद्दा ऐरणीवर

या घटनेच्या पार्श्वभूमीवर श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेतील अनधिकृत बांधकामे आणि अनियमिततांचा मुद्दाही समोर आला आहे. सातिवली येथील या शाळेला केवळ आठवीपर्यंतची (Standard 8) मान्यता असतानाही येथे दहावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. शिवाय शाळेचे बांधकाम देखील अनधिकृत असल्याचे सांगण्यात येत आहे.

वसई तालुक्यात सुमारे 97 अनधिकृत शाळा आहेत, ज्यामध्ये 69 प्राथमिक आणि 28 माध्यमिक शाळांचा समावेश आहे. शिक्षण विभागाने या शाळांची यादी जाहीर केलेली असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शिक्षण विभाग असमर्थ ठरत आहे. त्यामुळे अशा अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Advertisement
Topics mentioned in this article