Virar News : विरार पूर्व येथील उड्डाणपुलाखाली रात्री उशिरा अवैधरित्या सुरू असलेल्या सिगारेट, तंबाखू आणि गुटखा विक्रीच्या दुकानांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस आणि MSF सुरक्षा रक्षकाला एका टपरी चालकाने जोरदार हुज्जत घालत धक्काबुक्की केल्याचं समोर आलं आहे. या आरोपीने MSF जवानाची कॉलर पकडून गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मनीष झा असं या आरोपीचं नाव असून त्याने पोलिसांच्या अंगावर धावून जात त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र हे घडत असताना सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने बघ्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गुन्हेगारावर पोलिसांकडून कठोर प्रतिबंधात्मक कारवाई...
सरकारी कामात अडथळा आणून अरेरावी करणाऱ्या या आरोपीला विरार पोलिसांनी तत्परतेने ताब्यात घेतलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्यावरील तडीपारीच्या आदेशाची मुदत अवघ्या दोन दिवसांपूर्वीच संपली होती. तडीपार करण्याची कारवाई संपताच पुन्हा कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या या गुन्हेगारावर पोलिसांकडून कठोर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. परिसरात दहशत माजवणाऱ्या अशा समाजकंटकांविरुद्ध भविष्यातही अशीच धडक कारवाई सुरू राहील, असा कडक इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक एल. एम. तुरे यांनी दिला आहे.