मनोज सातवी, प्रतिनिधी
Vasai-Virar Municipal Corporation : वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या बदलीच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला. त्यांच्या निवासस्थानाव्यतिरिक्त 12 ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. त्यांच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांची 17 जुलै 2025 रोजी मुंबई महानगर प्रदेश गृहनिर्माण प्राधिकरण (MMR SRA), ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली होती. मात्र त्यांनी ही जबाबदारी तब्बल 11 दिवसांनी, म्हणजेच 28 जुलै रोजी सोडली. त्यामुळे पवार यांनी 11 दिवसांनंतर बदली का करून घेतली याबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत.
विशेष म्हणजे, त्याच दिवशी त्यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभाचा जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर या निरोप समारंभाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवार, दिनांक 29 जुलै 2024 रोजी अनिलकुमार पवार यांच्या वसईतील शासकीय निवासस्थानी तसेच नाशिक, पुणे अशा एकूण 12 ठिकाणी अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून छापे टाकण्यात आले.
नक्की वाचा - ईडीच्या अधिकाऱ्यांना पाहताच घराचं दार बंद केलं; वसई-विरारचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्या घरावर छापा
अनिलकुमार पवार यांची बदली ठाण्याला करण्यात आली होती आणि त्यांच्या जागी मनोजकुमार सूर्यवंशी यांची वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. मात्र, बदलीनंतरही अनिलकुमार पवार यांनी काही काळ पदावर राहून काही निर्णय, इमारतींच्या CC देणे, व्यवहार आणि ठेकेदार संबंधित फाइल क्लिअर केल्याचा देखील आरोप असल्याने ही कारवाई असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.