वाशिम शहरातील पाटणी चौक परिसरात काल 12 मेच्या रात्री दोन गटांमध्ये वाद होऊन तुफान हाणामारी झाली. दोन गटात दगडफेक झाल्याचेही व्हिडिओ समोर आले आहेत. त्यानंतर या घटनेचे पडसाद शहरातील इतर भागात पाहायला मिळाले. त्यामध्ये बागवान पुरा, दंडे चौक, गणेशपेठ भागात रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास अचानक तणाव निर्माण झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काही समाजकंटकांनी दंडे चौक परिसरातील काही घरांवर आणि वाहनांवर दगडफेक केली. या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. याशिवाय काही दुचाकींची देखील तोडफोड करण्यात आली.
नक्की वाचा - Akola News : डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्णच राहीलं, NEET ची तयारी करणाऱ्या अकोल्यातील 2 तरुणांचं टोकाचं पाऊल
घटनेची माहिती मिळताच वाशिमचे पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असून पोलीस प्रशासनानं नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत.