जाहिरात

Akola News : अकोला महापालिकेत भाजपचा सत्ता डाव यशस्वी; शारदा खेडकर महापौर, अमोल गोगे उपमहापौर

महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेचा सस्पेन्स आज अखेर संपला असून भाजपने अचूक राजकीय कूटनीतीच्या जोरावर महापालिकेवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.

Akola News : अकोला महापालिकेत भाजपचा सत्ता डाव यशस्वी; शारदा खेडकर महापौर, अमोल गोगे उपमहापौर

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Akola BJP Mayor : महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेचा सस्पेन्स आज अखेर संपला असून भाजपने अचूक राजकीय कूटनीतीच्या जोरावर महापालिकेवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. आज झालेल्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या शारदा खेडकर यांची महापौरपदी निवड झाली, तर उपमहापौरपदी अमोल गोगे यांनी विजय मिळवला. या निकालामुळे अकोल्याच्या राजकारणात मोठा पॉलिटिकल ट्विस्ट पाहायला मिळाला असून, विरोधकांचे सर्व अंदाज फोल ठरले आहेत. बहुमताचा स्पष्ट आकडा नसतानाही भाजपने मित्र पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करत आपली ताकद दाखवून दिली आहे.

अकोला महापालिकेत 45 विरुद्ध 32 मतांनी शारदा खेडकर यांचा निर्णायक विजय

अकोला शहरातील प्रभाग क्रमांक 15 च्या भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका असलेल्या शारदा खेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा 45 विरुद्ध 32 मतांनी पराभव केला. शारदा खेडकर यांना मिळालेल्या 45 मतांमध्ये भाजपचे 38 नगरसेवक, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 3, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचा 1, शिंदे गटाच्या शिवसेनेचा 1 तसेच 2 अपक्ष नगरसेवकांचा समावेश होता. विशेष म्हणजे काँग्रेस आघाडीत गेलेले भाजपचे माजी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचे पुतणे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी ऐनवेळी भाजपला पाठिंबा दिल्याने मतदानाचे चित्र पूर्णपणे बदलले. शहर सुधार आघाडीचे गटनेते पवन महल्ले तसेच शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते विजय इंगळे यांनी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांवर व्हिप लावला होता आणि त्यानुसारच ही मतदान प्रक्रिया पार पडली.

नक्की वाचा - Akoal News : 'याला प्रजासत्ताक दिन म्हणायचं का?' अकोल्यातील 3 घटना वादात, शाळेसह तहसील कार्यालयातही...

काँग्रेसचा दावा फसला; भाजपच्या कूटनीतीचा मोठा विजय

दरम्यान, एमआयएमचे तीन नगरसेवक ऐनवेळी तटस्थ राहिल्याने काँग्रेसने व्यक्त केलेला ‘चमत्कार' घडण्याचा दावा पूर्णपणे फोल ठरला. महापालिकेत बहुमत मिळेल, असा दावा काँग्रेस आघाडीने केला होता, मात्र प्रत्यक्षात भाजपने मित्र पक्षांच्या साथीने महापालिकेवरील सत्ता राखण्यात यश मिळवले. या निकालामुळे अकोला महापालिकेत भाजपच्या कूटनीतीचा मोठा विजय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सत्तास्थापनेमुळे आगामी स्थानिक राजकारणात भाजपची पकड अधिक मजबूत होणार असून, विरोधकांसमोर नवे राजकीय आव्हान उभे राहिले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com