संजय तिवारी, प्रतिनिधी
नागपुरातील एका अवैध सावकाराच्या दहशतीचे किस्से समोर येत आहेत. त्याचं नाव सागर दोशी असलं तरी त्याला त्याचे पीडित 'व्हिटॅमिन एम' या टोपण नावाने ओळखतात. लहान मुलांची किडनी काढून रक्कम वसूली करण्याची धमकी देणाऱ्या या अवैध सावकार व्हिटॅमिन एम उर्फ सागर दोशी विरोधात नागपुरच्या चार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी त्याला अटक केली असली तरी न्यायालयाने पोलिसांना त्याची पोलिस कोठडी अजून दिलेली नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
“आमच्या घरी या सोफ्यावर कोणी बसत नाही..कारण, तो इथेच येऊन बसत असे.. त्यामुळे आम्हाला अजून दहशत आहे.. कोणी पाहुणा या सोफ्यावर येऊन बसला तर त्याला पाणी देताना देखील आमचे हात थर थर कापतात..” असे सांगताना 39 वर्षीय कौस्तुभ आष्टीकर यांच्या डोळ्यात अश्रू अनावर होतात..
ऑर्डिन्स फॅक्टरीत नोकरी करणारे कौस्तुभ यांना अवैध सावकार सागर दोषी याने काव्या आणि कैवल्य या त्यांच्या दोन मुलांची चक्क किडनी विकून वसूली करण्याची धमकी दिली होती!हा अवैध सावकार घरी येऊन रात्री दीड वाजे पर्यंत बसत असे.. शिवीगाळ आणि धमक्या देत असे.. त्यावेळी घरात पुरुष नसल्याने आधार म्हणून शेजारी राहणाऱ्या भाग्यश्री समर्थ स्वतः रात्री येऊन बसल्या होत्या..
कौस्तुभ यांच्या मोबाईल फोन मध्ये एसएमएस मध्ये वसुलीचे संदेश आहेत. आरोपी सावकार एका एस एम एस मेसेज मध्ये लिहितो.. “फोन कसा नाही उचलायचा हे तुला आणि तुझ्या बायकोला उद्या समजावतो चांगल्यानी.. तुझ्याच घरात..” अन्य काही हिशोब सांगणारे एसएमएस सुद्धा आहेत. जे एसएमएसद्वारे अव्वाच्या सव्वा व्याज वसुलीचे हे गजब वसुलीची कहाणी सांगतात.
अवैध सावकार सागर दोषी उर्फ व्हिटॅमिन एम कडून केवळ दोन लाख रुपयांचे कर्ज काढलेल्या कौस्तुभ याना मोबदल्यात दहा पट रक्कम, महागडे दुकान आणि प्लॉट द्यावे लागले.. दहा टक्के दर महा व्याज, प्रती दिवस एक टक्का दंड, आणि त्यावर चक्रवाढ व्याज.. एका वर्षाला हा व्याज दर तीनशे ते चारशे टक्के पडायचा, असे कौस्तुभ सांगतात. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली तरी त्यांना पोलिस कस्टडी मिळालेली नाही.
आष्टीकर कुटुंबाने तीन वेळा पोलिसांत तक्रार दिली पण काही घडले नाही. मात्र नागपुरचे पोलिस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांना संपर्क केल्यावर गुन्हा दाखल झाला आणि आरोपी अवैध सावकाराला अटक करण्यात आली.. मात्र हे कुटुंब अद्याप दहशतीत जगत आहे.. आरोपी सुटून आल्यावर काय होणार? हा प्रश्न त्यांना सतावत आहे.