पुणे: भारतीय जनता पक्षाचे नेते, मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड गजा मारणेला अटक केली आहे. या प्रकरणात गजानन मारणे प्रत्यक्ष आरोपी नसला तरी त्याच्या सहकाऱ्यांसह त्याला अटक केल्याने गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर असलेला गजा मारणे नेमका आहे तरी कोण? जाणून घ्या सविस्तर...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहे गजा मारणे?
पुण्याच्या गुन्हेगारी जगतातील मोठे नाव म्हणजे गजानन मारणे. पुण्याचे मालक, महाराज अशा अनेक नावांनी तो प्रसिद्ध आहे. पुणे शहरातील कोथरुड भागात गजानन मारणे आणि मारणे टोळीची मोठी दहशत आहे. मुळशी तालुक्यातील जमीन व्यवहारांपासून गजानन मारणे गुन्हेगारी जगतात आला. जमीन मालक आणि बिल्डर यांच्यामधील दुवा म्हणून गजा मारणे काम करु लागला. त्याच्यासोबत निलेश घायवळ हे नाव सुद्धा कुख्यात गुंड म्हणून प्रसिद्ध झाले.
कोथरुड भागात दहशत अन् गँगवॉर...
जमीन व्यवहारातील दलाली आणि खंडण्यामधून गजा मारणे आणि गणेश घायवळने अवैध पैसा कमावला आणि बघता बघता कुख्यात गुंड म्हणून प्रसिद्ध झाला. घायवळ आणि मारणे टोळीला मानणारे अनेक तरुण तयार झाले आणि त्यांचे वर्चस्व वाढू लागले. मात्र या दोघांमध्ये वाद झाला आणि मारणे टोळी आणि घायवळ टोळीमध्ये गँगवार सुरु झाले.
(नक्की वाचा- Exclusive : 18 कोटींचं कर्ज माफ केलं 'ती' बॉलिवूड अभिनेत्री कोण? 'न्यू इंडिया' बँकेचा आणखी एक प्रताप)
गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे या राजकारणात सक्रिय होत्या. 2012 ते 2017 मध्ये त्या मनसेकडून नगरसेविका होत्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. खंडणी, मारहाण, हत्या, हत्येचे प्रयत्न असे अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे गजा मारणेवर आहेत.
काही वर्षांपूर्वी गजानन मारणे याला पप्पू गावडे आणि अमोल बुधे हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात त्याला सात वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली होती. तो जवळपास तीन वर्ष येरवडा जेलमध्ये होता. त्यानंतर त्याची नवी मुंबईतल्या तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली.
भव्य रोड शोमुळे वादात..
या प्रकरणात तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर गुंड गजा मारणे आणि त्याच्या टोळीने काढलेला रोड शो चर्चेचा विषय ठरला होता. तळोजा जेल ते पुणे अशी पुणे महामार्गावरुन निघालेल्या या रॅलीमध्ये तब्बल 600 गाड्यांचा ताफा होता. या प्रकरणावरुन पुणे पोलिसांची चांगलीच खरडपट्टी झाल्यानंतर गजा मारणेला पुन्हा एकदा अटक करण्यात आली होती.
राजकीय नेत्यांच्या भेटीमुळे चर्चा..
पुण्यामध्ये दहशत असलेल्या गुंड गजा मारणेचे असलेले राजकीय नेत्याशी संबंधही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गजा मारणेची घरी जाऊन भेट घेतल्याने चौफेर टीका झाली होती. त्यापाठोपाठ शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनीही गजा मारणेची घेतलेली भेट वादाचा विषय ठरली होती.