
New India Cooperative Bank : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील गैरव्यवहार, अनियमितता आणि इतर चुकीच्या कामकाजामुळे बँकेचे हजारो खातेधारक आज रस्त्यावर आले आहेत. खातेधारकांना आपले पैसे मिळतील की नाही याची चिंता लागून राहिली आहे. मात्र न्यू इंडिया बँकेने नियम डावलून बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कर्जावर खुली सूट दिल्याची माहिती उघड झाली आहे. या घोटाळ्याबाबत बँकेच्या कर्मचाऱ्यांना कल्पना होती. म्हणून त्यांनी याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देखील कळवलं होतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
न्यू इंडिया बँकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांच्याशी एनडीटीव्ही मराठीने सविस्तर बातचित केली होती. विद्याधर अनास्कर यांनी सांगितलं की, "न्यू इंडिया बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत 2020 मध्ये रिझर्व्ह बँकेला त्या बँकेत सुरु असलेल्या घोटाळ्याबद्दल सहीनिशी पत्रव्यवहार केला होता. अभिनेत्री प्रिती झिंटाला बँकेने 18 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते."
प्रिती झिंटाला कर्जात सूट
"प्रिती झिंटा हिने ते कर्ज फेडले नाही, त्यामुळे थकबाकी वाढली होती. बँकेने हे कर्ज वसूल करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. बँकेच्या नियमांचं कोणतेही पालन न करता ते कर्ज राइट ऑफ केले आणि ते बँकेच्या तोट्यात वर्ग केले", असं विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार प्रिती झिंटाने हे कर्ज कॅरेबियन देशांत टी-20 क्रिकेट स्पर्धेतील संघासाठी बोली लावण्यासाठी घेतले होते.
(नक्की वाचा- डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींचं काय होणार? रहिवाशांसमोर कोणता पर्याय? बँंकीग तज्ज्ञांनी दिली माहिती)
बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी सविस्तर मुलाखत
(नक्की वाचा- रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांनंतर व्यवहार ठप्प, ठेवीदारांची बँकेबाहेर गर्दी; तुमचंही या बँकेत खातं आहे का? )
माजी अध्यक्षांचा कोट्यवधींचा अपहार
बँकेचे तत्कालीन अध्यक्ष हिरेन भानू यांच्या कार्यकाळात झालेल्या आर्थिक अनियमितता, गैरव्यवस्थापन आणि भ्रष्टाचाराची सविस्तर माहिती बँकेच्या कर्मचाऱ्यांना रिझर्व्ह बँकेला दिलेल्या पत्रात दिली होती. रिपोर्ट्सनुसार 2010 पूर्वी बँकेने लहान कर्जे आणि प्राधान्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले. पण हिरेन भानू यांच्या आगमनानंतर, शाखा व्यवस्थापकांना माहिती नसताना 25 कोटी रुपयांपर्यंतचे कॉर्पोरेट कर्ज मंजूर होऊ लागले.
यातील बरीच मोठी कर्जे एका वर्षाच्या आत एनपीए झाली आणि निधी इतर बँकांमधून वळवण्यात आला. अशाप्रकारे बँकेचे माजी अध्यक्ष हिरेन भानू आणि त्यांच्या पत्नी यांनी कोट्यवधींचा अपहार केला. रिझर्व्ह बँकेने याकडे दुर्लक्ष केल्याचा मोठा फटका आता सामन्य खातेधारकांना बसत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world