
राहुल कुलकर्णी, मुंबई: दिल्लीमधील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झालेल्या मर्सिडीज वादाने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या विधानाने ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. साहित्य संमेलनात राजकीय नेते मंडळींना का बोलवावे लागते? असा सवाल करत यासाठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवारही जबाबदार आहेत, असं संजय राऊत म्हणाले होते. या संपूर्ण वादावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत गोऱ्हेंच्या विधानावरुन संताप व्यक्त केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले शरद पवार?
"गेले तीन दिवस मराठी साहित्य संमेलन दिल्लीत सुरू होते. कार्यक्रम यशस्वी झाला. मात्र या संमेलनात नीलम गोऱ्हेंनी केलेले विधान करायला नको होते. त्यांनी नाही त्या गोष्टी काढायची गरज नाही, असे म्हणत मी स्वागताध्यक्ष होतो, संजय राऊतांना मी जबाबदार त्यावर मला काही हरकत नाही, असे म्हणत नीलम गोऱ्हेंचे विधान मूर्खपणाचे आहे, असं म्हणायला हरकत नाही," अशा शब्दात शरद पवारांनी संताप व्यक्त केला आहे.
तसेच "नीलम गोऱ्हे यांच्या विधिमंडळातील चौथी टर्म आहे. या चार टर्म कशा मिळाल्या हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, त्याबद्दल चर्चा न केलेली बरी. त्यांची एन्ट्री प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षातून झाली, त्यानंतर राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत त्यांचा कालावधी गेला. आता त्या शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. म्हणजे मर्यादित काळात त्यांनी वेगवेगळ्या पक्षांचा अनुभव त्यांनी घेतल्याचे दिसत आहे, त्यामुळे त्यांनी असं भाष्य केलं नसतं तर योग्य झालं असते.." असंही शरद पवार म्हणाले.
(नक्की वाचा- Exclusive : 18 कोटींचं कर्ज माफ केलं 'ती' बॉलिवूड अभिनेत्री कोण? 'न्यू इंडिया' बँकेचा आणखी एक प्रताप)
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सत्कारावरुन केलेल्या टिकेलाही शरद पवार यांनी उत्तर दिले. "या साहित्य संमेलनाचा राजकीय वक्तव्यांसाठी वापर झाला असे म्हणणे चुकीचे आहे. हा आरोप मला मान्य नाही. मी कुणाचा सत्कार करायचा याचीही परवानगी घ्यावी लागणार असेल तर हे मी लक्षात ठेवीन," असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world