अजित पवार गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा असताना नवरात्रौत्सवाच्या गर्दीचा फायदा घेत बाबा सिद्दीकी (baba siddique news) यांच्यावर सहा राऊंड फायर करण्यात आले. यातील चार गोळ्या बाबा सिद्दीकी यांना लागल्या. यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने अख्खा महाराष्ट्र ढवळून गेला आहे. एका माजी राज्यमंत्र्यांचा अशा प्रकारे झालेल्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला आहे. काही महिन्यांपूर्वी बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला राम राम ठोकत अजित पवार गटात प्रवेश केला होता.
बिहारमध्ये राहणारे व्यावसायिक अब्दुल रहीम यांच्या घरात जन्मलेले जियाउद्दीन सिद्दीकी बाबा यांनी विद्यार्थी दशेत राजकीय करिअरला सुरुवात केली. ते 1977 पासून किशोरावस्थेत काँग्रेस पक्षात सामील झाले. 1980 मध्ये ते वांद्रे तालुका युवा काँग्रेसचे महासचिव झाले. दोन वर्षांच्या आत ते याचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
नक्की वाचा - Baba Siddiqui : बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे धक्कादायक कारण; गेल्या 30 दिवसांपासून सुरू होता हत्येचा प्लान
बाबा सिद्दिकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून अजित पवार गटात प्रवेश केला होता. तब्बल 48 वर्षे ते काँग्रेसमध्ये होते. त्यांची राजकीय सुरुवात एक विद्यार्थी नेता म्हणून झाली होती. पहिल्यांदा ते बीएमसीमध्ये नगरसेवक निवडून आले होते. 1999,2004, 2009 मध्ये सलग तीनवेळा ते आमदार झाले होते. बाबा सिद्दीकी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करीत होते. त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पाहिली होती. त्याशिवाय 1992, 1997 मध्ये ते नगरसेवक होते. 8 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला होता. 12 फेब्रुवारी रोजी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बाबा सिद्दीकी आपल्या भव्य इफ्तार पार्टीसाठी प्रसिद्ध होते. ज्यात सलमान खान, शाहरूख खान सारखे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार सहभागी होत होते.
नक्की वाचा - Big News : राजकीय वर्तुळात खळबळ! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाचं निधन
2014 मध्ये भाजप उमेदवाराकडून हरले होते बाबा सिद्दीकी..
बाबा सिद्दीकी यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरुवात एक विद्यार्थी नेता म्हणून केली होती. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत बाबा सिद्दीकी यांना मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी हरवलं होतं.
बाबा सिद्दीकींची हत्या कशी झाली ?
वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी भागात नवरात्रौत्सवाच्या फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्यात आला. येथून अवघ्या 50 ते 100 मीटरवर त्यांचा पूत्र झिशान सिद्दीकीचं कार्यालय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी गाडीत बसत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. सिद्दीकींवर सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यातील चार गोळ्या सिद्दीकींना लागल्या. यातील एक गोळी छातीत तर इतर गोळ्या पोटात लागल्या. सिद्दीकींच्या बचावासाठी आलेल्यावरही हल्ला करण्यात आला. सिद्दीकींच्या गाडीवरही गोळीबाराच्या खुणा दिसत आहेत. सिद्दीकांना तातडीनं लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान सिद्दीकींचा मृत्यू झाला.