Beed Crime : बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूती दरम्यान छाया गणेश पांचाळ या महिलेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप पतीकडून करण्यात आला आहे. याशिवाय प्रसूती चांगली करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आमच्याकडून दोन हजार रुपये घेतल्याचंही कुटुंबाकडून सांगण्यात आलं. हे प्रकरण ताजं असताना दुसऱ्या दिवशी प्रसूतीसाठी आलेल्या आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बीडच्या जिल्हा रुग्णालयात आज आणखी एका मातेचा मृत्यू झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयात चाललंय काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आठवड्यातील ही तिसरी घटना आहे.
नक्की वाचा - Beed Crime : डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आणखी एक बळी? प्रसृतीसाठी आलेल्या मातेने रुग्णालयातच सोडला जीव
रुक्मीन परशुराम टोने असे मृत मातेचे नाव आहे. 13 एप्रिल रोजी सकाळी रुक्मिणी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे सिझेरियन ऑपरेशन झाले. यादरम्यान त्यांनी 2300 ग्रॅम वजनाच्या मुलाला जन्म दिला. ही त्यांची चौथी प्रसूती होती. त्यामुळे कुटुंबाला फारशी भीती नव्हती.
महिलेवर आयसीयू विभागात उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुक्मिणी यांना पूर्वीपासून हृदयाशी संबंधित आजार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांची प्रकृती पाहता त्यांना दुसरीकडे हलवण्याचा सल्लाही देण्यात आला होता. परंतु ते गेले नाहीत. मात्र सलग दुसऱ्या दिवशी प्रसुतीसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयात चाललंय काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.