लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे म्हणून आवाहन केले जात आहे. निवडणूक आयोगा बरोबरच सर्वच राजकीय पक्ष त्यात आघाडीवर आहेत. मतदाना विषयी जनजागृतीचे कार्यक्रम आखले जात आहेत. असे असले तरी बुलढाणा जिल्ह्यातील एक दोन नव्हे तर पाच गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामागचं कारणही तसचं आहे. विशेष म्हणजे लोकसभाच नाही तर विधानसभा निवडणुकीचाही या गावांनी बहिष्कार केला आहे.
बहिष्काराचं काय आहे कारण?
बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या अकोला-खंडवा रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेतल्या जात आहेत असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५ गावातल्या शेतकऱ्यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगावजामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील ही गावं आहेत. कुवरदेव, खेललोन, खेल-शिवापूर, खेल-माळी, खेल-वर्गे या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या रेल्वे प्रकल्पासाठी संपादित केल्या जात आहेत. मात्र या शेतकऱ्यांना मोबदला देत असताना अत्यंत कवडीमोल भावाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळत असल्याचा आरोप होत आहे. शेतकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून कुठलीच दखल घेतली जात नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय यागावातल्या शेतकऱ्यांनी घेतला आहे.
हेही वाचा - महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, आज संयुक्त पत्रकार परिषद; कोण किती जागा लढवणार?
प्रशासनाला कळवली नाराजी
बुलढाणा जिल्ह्यातील या पाचही गावातील शेतकऱ्यांनी आपली नाराजी स्थानिक प्रशासनाला कळवली आहे. त्याबाबतचं निवेदनही देण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतल्यानं प्रशासनाला जाग येईल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे. आपल्या मागणीकडे लक्ष दिले जाईल आणि योग्य मोबदला आपल्या पदरात पडेल अशी अपेक्षा त्यांची आहे. अनेकाचं पोट हे याच जमिनीवर आहे. तीच जमिन ताब्यातून जात आहे. अशा वेळी जगायचं कसं असा प्रश्न या शेतकऱ्यां पुढे आहे. त्यामुळेच योग्य मोबदला मिळावा ही त्यांची अपेक्षा आहे. आता त्यांच्या या मागणीकडे प्रशासन आणि स्थानिक पुढारी कशा पद्धतीनं पाहातात ते पाहावं लागेल.
हेही वाचा - पवारांची जाहीर सभा... धमकीची चिठ्ठी... 'त्या' सभेत नेमकं काय झालं?