शरद पवारांनी सध्या बारामती लोकसभेत सध्या सभांचा धडाका लावला आहे. या मतदार संघात सुप्रिय सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी थेट लढत होत आहे. अशा वेळी लेकीसाठी शरद पवार संपुर्ण मतदार संघ पिंजून काढत आहेत. सुपे इथं पवारांनी जाहीर सभा घेतली. पण या सभेत एक चिठ्ठी गाजली. ही चिठ्ठी अशी तशी नव्हती. ती चिठ्ठी होती धमकीची. जाहीर सभेत ही चिठ्ठी शरद पवारांनी वाचून दाखवली. त्यानंतर त्याचं आक्रमक रूप पाहून सर्वच जण आवाक झाले.
चिठ्ठीत काय होती धमकी?
सुप्याच्या जाहीर सभेत शरद पवारांनी एक चिठ्ठी काढली. ही चिठ्ठी धमकीची होती. त्यात काय धमकी होती तेच पवारांनी वाचून दाखवली. पाणी पाहिजे असेल तर घड्याळाला मतदान करा, ऊस कारखान्याला जायचा असेल तर मतदान करा. हे वाचून दाखवल्यानंतर पवार म्हणाले, तुम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडू नका. तुम्हाला माहिती नसेल जे धमकी देत आहेत, दम देत आहेत, त्यांना संधी कुणी दिली? आता त्यांना दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. असं सांगताच सुप्याच्या सभेत उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.
हेही वाचा - विजय शिवतारेंचा सुनेत्रा पवारांना शब्द, मताधिक्य किती देणार तेच सांगितलं
सिंचन योजनेचा प्रश्न पेटला?
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बारामती लोकसभेतील सिंचन योजनांचा प्रश्न गाजत आहे. शरद पवारांनी या योजनेचा आवर्जून उल्लेख केला. जनाई-शिरसाई योजनेच्या कामाची जबाबदारी मी ज्यांच्यावर दिली होती, त्यांना ती पार पाडता आली नाही. गेली २० वर्षे मी स्थानिक विषयात लक्ष घातले नाही. पण आता लक्ष घालणार आहे. माझी जबाबदारी पार पाडणार आहे. बारामतीच्या जिरायत भागाने नेहमीच भरभरून प्रेम दिल्याचा उल्लेखही यावेळी पवारांनी केला. त्यामुळे माझ्या माणसांचे प्रश्न सोडवणे हे माझं कर्तव्य असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा - सुनेत्रा पवारांसाठी मोदी आणि भाजपचा मोठा प्लॅन
कोणीही मायचा लाल...
जनाई शिरसाई योजनेचा प्रश्न निवडणुकीच्या तोंडावर चांगलाच तापला आहे. हे लक्षात आल्यानंतर अजित पवारांनीही याच भागात शेतकरी मेळावा घेतला होता. या मेळाव्यात बोलताना हे काम करायचे झाले तर मीच करू शकतो, कोणीही मायचा लाल हे काम करू शकत नाही, असे ते बोलले होते. तर शरद पवारांनीही त्याला प्रत्युत्तर देत ही योजना माझ्या सहीने झाली होती याची आठवण करून दिली. दरम्यान जिरायती भागातील मते या दोन्ही गटासाठी महत्वाची आहेत. त्यामुळे दोन्ही पवार या भागावर लक्ष केंद्रीत करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world