बीड लोकसभेत एक ट्विस्ट निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यात आहे. ओबीसी बहुजन पार्टीने बीडमध्ये आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे. विशेष म्हणजे या उमेदवाराने आपल्याला छगन भुजबळ यांचे आशिर्वाद असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा वाद ठिणगी पडण्याची शक्यता आहे. यावर भुजबळ आता काय मार्ग काढतात, काय भूमिका घेतात याकडे संपुर्ण महाराष्ट्रातील ओबीसींचे लक्ष लागले आहे.
ओबीसी बहुजन पार्टी मैदानात
लोकसभा निवडणुचीचे वातावरण चांगलेच तापले आहेत. त्यात बीड लोकसभा मतदार संघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या मतदार संघातून भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदार संघात आता ओबीसी बहुजन पार्टीने आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. प्राध्यापक टी.पी. मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही निवड लढवण्याची घोषणा केली गेली आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंचे टेन्शन नक्कीच वाढणार आहे.
छगन भुजबळांचा आशिर्वाद कोणाला?
टी. पी मुंडे यांनी अजून एक गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे तर पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होवू शकते. मुंडे यांनी आपल्या उमेदवारीला छगन भुजबळांचा आशिर्वाद आहे, असा दावा केला आहे. त्यामुळे संपुर्ण ओबीसी समाज आपल्या मागे उभा राहील असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसं झाल्यास त्याचा थेट फटका पंकजा यांना बसू शकतो. दरम्यान याबाबत भुजबळांनी अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. भुजबळ हे महायुतीत आहेत. त्यामुळे पंकजांचा प्रचार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अशा स्थितीत ओबीसी बहुजन पार्टीकडून आलेल्या वक्तव्यावर ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ओबीसीअसून पंकजां विरोधात उमेदवार का?
पंकजा मुंडे या स्वत: ओबीसी आहेत. असे असतानाही ओबीसी बहुजन पार्टीने त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे. यामागचे कारण विचारले असता मुंडे यांनी पंकजा या ओबीसी आंदोलनात कुठेही नव्हत्या. ओबीसींसाठी आम्ही संघर्ष केला. मराठा समाजाच्या शिव्या खालल्या असेही मुंडे यावेळी म्हणाले. त्यामुळे ओबीसींचा आवाज लोकसभेत जावा, त्यांचे प्रश्न संसदेत मांडले जावेत यासाठी उमेदवार उभा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.