महायुती असो की महाविकास आघाडी. दोन्हीकडे मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे बंडखोरांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदार संघातही अशीच स्थिती आहे. इथे महायुतीत बंडखोरी झाली आहे. हा मतदार संघ महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गेला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या दोन नेत्यांनी इथे बंडखोरी केली आहे. मात्र त्यातील एकाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेत दुसऱ्या भाजप बंडखोराला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. अशा वेळी अजित पवारांच्या विद्यमान आमदाराचे टेन्शन मात्र वाढले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर मतदारसंघात भाजपचे बंडखोर माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या बरोबर भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. अहमदपूर चाकूर मतदारसंघांमध्ये एससी एसटी ओबीसी या सर्व जातींमधून एकच उमेदवार द्यावा अशी मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्याकडून करण्यात आली होती. त्यामुळे माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे. त्यांनी तशी भूमीकाही जाहीर केली आहे. शिवाय भाजप प्रवक्ते गणेश हाके यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
ट्रेंडिंग बातमी - पालघरमध्ये चाललंय काय? एका मागोमाग नेते का होत आहेत गायब?
महायुतीत या मतदार संघात बंडखोरी झाल्याचे स्पष्ट आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षा बरोबर युती केल्याचा राग इथे भाजप मध्ये आहे. तो राग प्रवक्ते गणेश हाके यांनी बोलूनही दाखवला होता. तेच हाके आता निवडणूक मैदानात उतरले आहे. त्यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादीच्या उमेदवारा विरोधात दंड थोपटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांनी रिंगणात उतरवले आहे. अशा वेळी महायुतीत बंडखोरी झाल्याने अजित पवारांचे टेन्शन मात्र वाढले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवारी शेवटची तारीख आहे. तोपर्यंत बंडखोरांना थंड करण्याचे काम केले जात आहे. काही ठिकाणी यश येत आहे तर काही ठिकाणी बंडखोर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे लातूरच्या अहमदपूर विधानसभा मतदार संघात बंडोबा थंड होणार की दंड थोपटून निवडणूक लढवण्यावर ठाम राहाणार हे सोमवारी स्पष्ट होणार आहे. त्यात हाके यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला टोकाचा विरोध आहे. त्यामुळे इथलं बंड शमलं नाही तर ते अजित पवारांसाठी धोक्याची घंटा असेल अशी चर्चा आहे.