अजित पवार सध्या भलतेच आक्रमक झाले आहे. बारामतीत प्रचार करताना ते थेट शरद पवारांच लक्ष्य करत आहे. त्यांच्या एका वक्तव्याने तर आता पवार विरूद्ध पवार हा वाद पेटण्याची दाट शक्यता आहे. 4 वेळा मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय आणि 5 वेळा उपमुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय बघा. मी घेतलेले निर्णय सर्वात चांगले होते असं सांगत त्यांनी पवारांच्या मुख्यमंत्री काळात झालेल्या निर्णयाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. अजित पवारांनी शरद पवारांच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. शिवाय उपमुख्यमंत्री असतानाही आपण कसे चांगले निर्णय घेऊ शकलो हे सांगण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. शिवाय उपमुख्यमंत्री व्हायचं आपलं रेकॉर्ड कुणी मोडणार नाही असेही ते म्हणाले.
'प्रश्न सोडवण्याची ताकत अजित पवारमध्ये'
सत्तेस नसताना पन्नास कोटीचाही निधी मिळत नव्हता. सत्तेत जाताच पाचशे कोटीचा निधी आणला. तुमचे प्रश्न सोडवण्याची ताकद फक्त अजित पवारमध्ये आहे असेही अजित पवारांनी स्पष्ट केले. इतकं करून देखील लोकं समोरच्या बाजूनं आहेत. ही बाब आपल्याला खटकत असल्याचेही अजित पवार म्हणाले. बारामतीत आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
'आम्हाला काही करू दिलं नाही'
प्रत्येक जण आता सांगत असतील आम्ही हे केले ते केले. पण पन्नास वर्ष आम्ही केलं आता तुम्ही करा असं आम्हाला सांगण्याची गरज होती. पण आम्हाला काहीच करू दिलं नाही असा आरोपही अजित पवारांनी शरद पवारांचे नाव न घेता केले. मतं मागताना भावनिक करतील पण यावेळी भावनिक होऊ नका. असं आवाहन ही अजित पवारांनी यावेळी केलं. एवढी काम करून देखील तुम्ही मला यश देणार नसाल तर मला वेदना होणार नाहीत का? एवढी कामे दुसऱ्या तालुक्यात केली असती तर मला बिनविरोध निवडून दिले असते असेही ते यावेळी म्हणाले.
सुनेत्रा पवारांवरील टिका जिव्हारी
सुनेत्रा पवारांचा उल्लेख शरद पवारांनी बाहेरची असा केला होता. या टिकेवर अजित पवार पहिल्यांदाच बोलले. ही टिका त्यांच्या जिव्हारी लागली आहे. एखादी व्यक्ती 40 वर्ष घरात राहूनही ती परकी मानली जाते. याचा विचार आता महिलांनी केला पाहिजे असं आवाहनी त्यांनी यानिमित्ताने केले. वरिष्ठ जर तुम्हाला परकी म्हणत असतील तर तळपायाची आग मस्तकात जाणार नाही का? असं म्हणत अजित पवारांनी आपला संताप व्यक्त केला.
'दाऊदशी संबंधाचे आरोप'
भ्रष्टाचाराचे आरोप आपल्यावर केले जाता. विरोधक काहीही बोलायला लागले आहेत. मी त्यांना उत्तर देत नाही. अरे मंत्री झाला तर आरोप होतील ना? खासदार आणि आमदार झाला तर आरोप होतील ना? एन्रॉनचे भूखंडाचे श्रीखंड कुणी खाल्ले? दाऊदशी संबंध हे आरोप झाले नाहीत का? ते कुणावर झाले? त्यात काही तथ्य नाही पण आरोप हे होतच राहातात हे सांगतानाही अजित पवारांनी शरद पवारांना लक्ष्य केले.