दादा की काकी? रोहित पवारांचं 'ते' वक्तव्य अन् बारामतीत सस्पेन्स वाढला?

जाहिरात
Read Time: 3 mins
धाराशीव:

रोहित पवार हे धाराशीवमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले आहेत. जरी ते धाराशीवमध्ये आले असले तरी इथं चर्चा मात्र बारामतीचीच आहे. त्यांच्या बारामती बाबतच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. त्यांनी केलेले वक्तव्य अजित पवारांच्या जिव्हारी लागणारे असेच आहे. बारामतीत पुढे काय होऊ शकतं यावरच रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. हे भाष्य करताना त्यांनी अजित पवारांना डिवचताना भाजपलाही सुनावलं आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे बारामतीबाबत पडद्या मागे अजून काही घडामोडी घडत आहेत का? याची चर्चा मात्र सुरू झाली आहे. 

रोहित पवार नेमकं काय म्हणाले? 
बारामतीतला उमेदवार शेवटच्या क्षणी बदलला जाऊ शकतो. याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. याबाबत रोहित पवारांना विचारले असता त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.     दिल्ली वरून आदेश आले असतील तर दादा काही करतील. पूर्वी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली अजितदादा आदेश देत होते. आता त्यांना दिल्लीचा आदेश ऐकावा लागतो. दिल्लीवरून आदेश आला की फॉर्म भरा तर ते स्वत: फॉर्म  भरतील. आदेश आला फॉर्म कायम ठेवा की ते फॉर्म कायम ठेवतील. काकींचा फॉर्म मागे घ्या, तर त्यांना ते ऐकावं लागेल, जरी ते त्यांच्या मनाच्या विरोधात असलं तरी, असे वक्तव्य करून रोहित पवारांनी बारामतीतला सस्पेन्स मात्र वाढवला आहे. यातून त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. एक तर अजित पवार हे दिल्लीचे मांडलीक कसे झाले आहेत हे त्यांना सांगायचं होतं तर दुसरीकडे त्यांना भाजपलाही लक्ष करायचं होतं.     

Advertisement

धाराशीवमध्ये रोहित पवार 
आमदार रोहित पवार धाराशीवमध्ये आहेत. ते ओमराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहाणार आहेत. या आधी त्यांनी तुळजाभवानीचे दर्शन घेतले.  महाराष्ट्राच्या तमाम लोकांसमोर असलेल्या अडचणी संपू दे असं साकडं त्यांनी देवीला घातलं.  राज्यात खालच्या पातळीच राजकारण सुरू आहे. राजकीय संस्कृती काही लोकांनी बिघडवली आहे. अशात लोकांची काळजी घेणारं सरकार या देशात येऊ दे असं साकडं ही रोहित पवारांनी घातलं आहे. दरम्यान राज्यात भाजप विरोधात वातावरण असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभेत भाजपचा पराभव होईल असंही ते म्हणाले. राजकारणात नात्यापेक्षा विचार महत्वाचे असतात असंही त्यांनी सांगितलं. शिवाय भाजपने सत्तेसाठी दोन पक्ष आणि एक कुटुंब फोडलं असंही ते म्हणाले. 

Advertisement

बारामतीत सुनेत्रा पवारांना उमेदवारी 
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं बारामतीतून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असतील. सुरूवातीला त्यांच्या उमदवारीला शिवसेना शिंदे गटाकडून विरोध झाला होता. मात्र त्यावर तोडगा काढण्यात आला. बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगत आहे. राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी असाच सामना या मतदार संघात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे बारामतीकर साहेबांना साथ देणार की दादांना गुलाल उधळण्याची संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

Advertisement