लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सातारा, ठाणे, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, पालघर, दक्षिण मुंबई या मतदारसंघावर महायुतीमधील दोन किंवा त्यापेक्षा जास्त पक्षाचा दावा आहे. त्यामुळे तिढा निर्माण झाला होता. यामधील सातारा आणि रत्नागिरी-सिंधुदूर्ग जागा भाजपाकडं गेलीय. तर नाशिकची जागा शिवसेनेला मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. सातारा आणि नाशिक या दोन जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होता. त्यानंतरही पक्षाला जागावाटपांच्या वाटाघाटीत माघार घ्यावी लागली. या माघारीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत आले आहेत.
काय आहे कारण?
या जागावाटपावर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट अजित पवारांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचं शुक्रवारी जाहीर केलं. भुजबळांच्या माघारीनंतर पक्षातील नाराजीनाट्य आणखी वाढल्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आत्तापर्यंत स्वपक्षातील केवळ दोन उमेदवारांना (बारामती, रायगड) उमेवारी दिली आहे. तर अन्य ठिकाणी उमेदवार आयात (धाराशिव, शिरुर) केले आहेत. नाशिक लोकसभेच्या जागेबाबतही निर्णय घेण्यास तीन आठवडे विलंब लागल्यानं नाराजीत भर पडली आहे.
भुजबळांनी माघार घेताच गोडसे अॅक्शन मोडमध्ये, उमेदवारीबद्दल म्हणाले....
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यातून घड्याळ चिन्ह हद्दपापर झालंय, त्यामुळे देखील हा गट नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. साताराची जागा लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होता. त्यानंतरही इथं भाजपाच्या उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झालीय. तर नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या नावासाठी भाजपा हायकमांड अनुकूल असूनही त्यांना माघार घ्यावी लागली आहे.