- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारी वाटपामुळे अंतर्गत असंतोष समोर आला आहे.
- विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानासमोर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले.
- काँग्रेसमध्येही उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी सुरू असून आकाश कवडे ठाकरे सेनेत गेले आहेत.
योगेश शिरसाट
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी वाटपावरून शहरातील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे. काँग्रेसनंतर आता भाजपमध्येही अंतर्गत असंतोष उघडपणे समोर आला आहे. भाजपचे महानगरप्रमुख व माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या उमेदवारी अर्जाला कात्री लावल्याच्या निषेधार्थ आज त्यांच्या निवासस्थानासमोर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार आक्रोश केला. पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करूनही डावलण्यात आल्याचा आरोप करत अनेक कार्यकर्ते भावूक झाले. विशेषतः प्रभाग क्रमांक 2 मधील अनुसूचित जाती विभागातून किशोर मानवटकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने नाराजी अधिकच वाढली. आंदोलनादरम्यान तणाव निर्माण झाला असून विजय अग्रवाल यांची प्रकृती अचानक खालावल्याने तात्काळ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला.
नक्की वाचा - Kalyan Dombivli : कल्याण डोंबिवलीत मतदानापूर्वीच कमळ फुललं; भाजपाची विजयाची हॅटट्रिक!
दुसरीकडे काँग्रेसमध्येही उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी उफाळून आली आहे. काँग्रेसचे कट्टर समर्थक आकाश कवडे यांचे तिकीट कापल्याने त्यांनी ठाकरे सेनेत प्रवेश करत उमेदवारी मिळवली. तर काँग्रेसचे माजी नगरसेवक मोहम्मद नौशाद शेख यांनाही तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. नौशाद शेख यांनी काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्यावर पैसे घेऊन तिकीट दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या संतापातून त्यांच्या कार्यकर्त्यांनी साजिद खान पठाण यांच्या पोस्टरला काळा फासला. यासोबतच काँग्रेसच्या उमेदवारांना मुस्लिम समाजाने मतदान करू नये, असे आवाहन करत एमआयएमकडे वळण्याचे संकेत दिले आहेत. या घडामोडींमुळे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक 9 मध्ये एआयएमआयएम पक्षावर तिकीट विक्रीचे गंभीर आरोप झाले आहेत. इच्छुक उमेदवार सैयद शहजाद यांच्या भावाने पक्षाकडून पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा आरोप करत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सैयद शहजाद यांना उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ऐनवेळी दुसऱ्या उमेदवाराकडून पैसे घेऊन तिकीट देण्यात आले. या व्हिडीओमुळे एमआयएमच्या स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अद्याप एमआयएमकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world