देश नरेंद्र मोदी यांच्या हातात सुरक्षित आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वात हा देश सुरक्षित राहू शकतो का असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. मुंबईत घाटकोपर इथं महायुतीच्या प्रचार सभेत अमित शाह बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातल्या महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. शिवाय निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. शिवाय आघाडीचा सुपडा साफ होईल असंही ते म्हणाले. आघाडीचा जाहीरनामा हा फसवा असून त्यांच्या थापांना भुलू नका असे आवाहन ही त्यांनी यावेळी उपस्थिताना केले. इथं फक्त मोदींची गॅरंटी चालते असंही ते म्हणाले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात दहशतवाद संपवला आहे. नक्षलवाद्यांचा बंदोबस्त केला आहे. काँग्रेसच्या काळात मात्र पाकिस्तानातून दहशतवादी हे भारतात येत होते. त्यानंतर हल्ले करून ते पाकिस्तनातही जात होते. या घटना वारंवार होत होत्या. काँग्रेस सरकार त्यावेळी काही करू शकत नव्हते. अशा स्थितीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित राहू शकतो का? असा प्रश्न अमित शाह यांनी या सभेत उपस्थित केला. मोदींनी त्या उलट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. काँग्रेस आणि त्याचे मित्र पक्ष विरोधाला विरोध करतात असा आरोपही यावेळी शाह यांनी केला.
धर्माच्या आधारवर कोणालाही आरक्षण देणार नाही असं अमित शाह यांनी ठाम पणे सांगितलं. शिवाय वक्फ बोर्डाच्या विधेयकात सुधारणा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या गोष्टीला वोट बँकेच्या राजकारणासाठी काँग्रेस, शरद पवार, उद्धव ठाकरे हे विरोध करत आहेत असंही ते म्हणाले. दरम्यान देशात मोदींच सरकार नसत तर हे मुंबई शहर राहाण्या सारखं राहीलं नसते. मुंबईत अनेक विकास कामं होत असल्यचे त्यांनी सांगितले. अटल सेतू, कोस्टल रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ याचा संदर्भ त्यांनी यावेळी दिला. महायुतीचं सरकार पुन्हा आल्यास याच वेगाने मुंबईचा विकास केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. देशाची अर्थव्यवस्था ही जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था लवकरच होईल असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - 'सगळंच उकरायला गेले तर, बात बहुत लंबे तक जायेगी' पवार- भुजबळांत जुंपली
निवडणुकीच्या दरम्यान आपण पुर्ण महाराष्ट्र फिरलो आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल काय लागेल हे आधीच सांगतो असंही ते म्हणाले. राज्यात महायुतीचं सरकार येणार हे निश्चित असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय महाविकास आघाडीचा सुफडा साफ होणार असल्याचेही ते म्हणाले. महायुतीने जाहीरनामा दिला आहे. त्यातील वचने पुर्ण केली जातील. ही मोदींची गॅरंटी आहे असंही ते म्हणाले. उलट काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर काँग्रेसच्या अध्यक्षांनाच विश्वास नाही असंही ते म्हणाले. आम्ही जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करणार असल्याचेही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - '...तर बाळा साहेबांनी उद्धव ठाकरेंचा हात मोडला असता' राणेंनंतर कदम हे काय बोलले?
दरम्यान 370 कलम पुन्हा काश्मीरमध्ये लागू केलं जाणार नाही. राहुल गांधी यांची चौथी पिढी जरी आली तरी ते हटवता येणार नाही असं शाह यावेळी म्हणाले. 370 कलमा बाबत उद्धव ठाकरे यांची भूमिका काय आहे हे त्यांनी जाहीर पण स्पष्ट करावी असेही ते म्हणाले. राम मंदीरालाही काँग्रेसने विरोध केला होता. ते राम मंदीर मोदींनी बांधून दाखवलं असतंही ते म्हणाले. मुस्लीमांचे लांगूलचालन काँग्रेस करत असल्याचा आरोपही यावेळी अमित शाह यांनी केला. आघाडीचे नेते महाराष्ट्राचा मुंबईचा विकास करू शकत नाही असे ही ते म्हणाले. जनतेची केवळ ते दिशाभूल करत आहेत. त्यामुळे सुरक्षित आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी मोदींचे हात बळकट करा असे आवाहन त्यांनी केले.