चिखलीकरांची सभा, अशोक चव्हाणांचा कस, अमित शहा काय बोलणार?

जाहिरात
Read Time: 2 mins
नांदेड:

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज गुरूवारी नांदेड इथं जाहीर सभा होत आहे. प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत. ही सभा जरी प्रताप पाटील चिखलीकरांची असली तरी खरा कस हा अशोक चव्हाणांचा लागणार आहे. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाल्यासारखी आहे. त्यामुळे अमित शहां समोर शक्ती प्रदर्शन करण्याची आयती संधी चव्हाणांना मिळाली असल्याचं बोललं जात आहे. शिवाय अशोक चव्हाण या निमित्तानं काय बोलतात याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. 

अशोक चव्हाण शक्तीप्रदर्शन करणार 
नांदेड हा काँग्रेसचा गड होता. अशोक चव्हाणांनी मोठी फळी या मतदार संघात उभी केली होती. पण आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले आहेत. त्यांना राज्यसभेवरही घेण्यात आलं आहे. आता याच नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जाहीर सभा घेत आहेत. भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासाठी ही सभा आहे. सभा जरी चिखलीकरांची असली तरी अशोक चव्हाण या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्याची संधी सोडणार नाहीत अशीच चर्चा सुरू आहे. भाजप प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे जिल्ह्यातील अनेक नेते अशोक चव्हाणांबरोबर भाजपमध्ये आले आहेत. 

अमित शहा काय बोलणार? 
अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर अमित शहा पहिल्यांदाच नांदेडला येत आहेत. त्यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशोक चव्हाणांनी भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांना लगेचच राज्यसभेवर घेण्यात आलं. त्यामुळे सत्ता आल्यानंतर मंत्रीपदाचं बक्षिसही मिळणार का याबाबत शहा काय बोलतात याबाबत नांदेडमध्ये उत्सुकता आहे. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर अमित शहांची सभा होत आहे. त्यामुळे ते उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसवरही काय बोलतात याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. 

नांदेडमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस 
अशोक चव्हाण जरी भाजपमध्ये आले असले तरी दुसऱ्या चव्हाणांनी भाजप समोर आव्हान उभं केलं आहे. या मतदार संघात भाजप विरूद्ध काँग्रेस अशी थेट लढत होत आहे. भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण अशी ही लढत होत आहे. वसंत चव्हाणांनीही मतदार संघात जोर लावला आहे. त्यामुळे ही लढत अशोक चव्हाण जरी काँग्रेसमध्ये नसले तरी तुल्यबळ होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे कोणते चव्हाण उजवे ठरतात हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.  
  

Advertisement