आढळराव नाही तर 'हे' होते शिरूरचे पहिल्या पसंतीचे उमेदवार, कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट

जाहिरात
Read Time: 2 mins
शिरूर:

शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवारी म्हणून शिवाजी आढळराव पाटील हे पहिल्या पसंतीचे उमेदवार कधीच नव्हते. त्यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच विरोध होता. शिंदेंनी दुसऱ्या एका बड्या नेत्याचे नाव सुचवले होते. मात्र त्यांनी शिरूरमधून निवडणूक लढण्यास नकार दिला असे वक्तव्य करून शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी ज्या व्यक्तीचे नाव घेतले आहे त्यामुळे शिरूर बरोबर राज्यातील राजकारणही तापणार आहे. 

हेही वाचा - रायबरेलीत गांधी विरूद्ध गांधी? भाजप खेळणार मोठा डाव?

कोल्हेंनी कोणाचे नाव घेतले? 

शिरूर लोकसभेतून महायुतीकडून आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोध होता. त्यांच्या ऐवजी छगन भुजबळांनी यामतदार संघातून निवडणूक लढावी असा आग्रह मुख्यमंत्र्यांनी धरल्याचा गौप्यस्फोट अमोल कोल्हे यांनी केला आहे. मात्र भुजबळ यांनी शिरूरमधून निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यामुळे आढळरावांना नाईलाजाने उमेदवारी द्यावी लागले असेही ते म्हणाले.    

 
'बेडूक उड्या मारणारा उमेदवार' 

समोर सक्षम उमेदवार असता तर मी बोललो असतो. महायुतीचे उमेदवार चार पक्षातून बेडुक उड्या मारून आले आहेत असा हल्लाबोल कोल्हे यांनी केला. आधी ठाकरेंच्या सेनेत, नंतर शिंदेंच्या सेनेत, आणि आता राष्ट्रवादी अजित पवार गटात असे पक्ष बदलणारे हे उमेदवार असल्याचे कोल्हे म्हणाले. ज्यांना आपल्या विरोधात निवडणूक लढण्याचे आव्हान दिले होते त्यांच्याच पक्षात जाऊन आता ते उमेदवार झाले आहेत अशी टिकाही कोल्हे यांनी केली.

शिरूरचा गड कोल्हे राखणार? 

शिरूर लोकसभेत राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगतोय. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजी आढळराव पाटील रिंगणात आहेत. तर शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे पुन्हा एकदा नशिब आजमावत आहेत. ही जागा काही करून जिंकायची असा चंग त्यांनी बांधला आहेत. तर अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणार अशी शपथच अजित पवारांनी घेतली आहे. त्यामुळे इथली लढत ही रंजक ठरणार हे निश्चित आहे. दोन्ही उमेदवारांनी आपली पुर्ण ताकद लावली आहे. शिरूर लोकसभेत 4 थ्या टप्प्यात 13 मे ला मतदान होणार आहे.

Advertisement