Badlapur Municipal Council Results : गेल्या अनेक वर्षांपासून जिथं शिवसेनेचा नगराध्यक्ष राहिला त्या कुळगाव बदलापुरात यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत भाकरी फिरल्याचं चित्र आहे. यंदा बदलापुरला भाजपचा नगराध्यक्ष मिळाला आहे. शिंदे सेनेला हा सर्वात मोठा हादरा असल्याचं मानलं जात आहे. अंबरनाथ आणि बदलापुरातील शिंदेंच्या शिवसेनेची अधिकांश जबाबदारी श्रीकांत शिंदे पाहतात. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
निवडणुकीदरम्यान नकारार्थी प्रचार...
बदलापुरात शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचा शहरावर वचक होता. मात्र निवडणुकीदरम्यान नकारार्थी प्रचार त्यांना भोवल्याचं म्हटलं जात आहे. कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वामन म्हात्रे यांच्या घरातील दोन-तीन नव्हे तर सहा जणांना उमेदवारी देण्यात आली होत. वामन म्हात्रे यांच्यासह त्यांची पत्नी, भाऊ, मुलगा, भावजय, भाचा अशा एकूण एकाच घरातील 6 जणांना शिवसेनेचे तिकीट देण्यात आलं होतं. इतकच नव्हे तर बदलापुरातील विविध राजकीय कार्यक्रमांमध्येही वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील मंडळींचा मोठा हस्तक्षेप पाहायला मिळतो.
बदलापूर नगराध्यक्ष पदी भाजपच्या रुचिता घोरपडे विजयी झाल्या आहेत. भाजपाच्या रुचिता घोरपडे ७४३३ मतांनी विजयी झाल्या आहेत. यंदा भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी मोठं बॅकिंग लावलं होतं. किसन कथोरे यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांचं बदलापुरकडे लक्ष होतं. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापुरात सभा घेऊन प्रचार केला होता. परिणामी भाजपने बदलापुरात पहिल्यांदाच विजयाचा झेंडा रोवला आहे.
बदलापूर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना तेराव्या फेरी अंती मिळालेली एकूण मते
रुचिता घोरपडे (भाजप) मिळालेली मते ६०९९८
वीणा म्हात्रे (शिंदे सेना) मिळालेली मते ५३५६५
प्रिया गवळी (उद्धव सेना) मिळालेली मते ४८५२
भाजपाच्या रुचिता घोरपडे ७४३३ मतांनी विजयी