विधानसभा निवडणुकीच्या निकालाला काही तास शिल्लक आहेत. मात्र निकाल लागण्या आधीच कार्यकर्ते मात्र उत्साहात आहेत. त्यांनी आपल्या नेत्याचा विजय नक्की होणार हे गृहीत धरले आहे. त्यातून अनेक ठिकाणी आमदार म्हणून बॅनरही झळकले आहेत. असाच एक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तो म्हणजे शिवसेनेचे कुडाळ मालवणचे उमेदवार निलेश राणे यांचा. नवनिर्वाचित आमदार असा निलेश राणे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय त्यांना शुभेच्छाही देण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निलेश राणे यांच्या अभिनंदनाचे बॅनर मतदार संघात लागले आहे. त्यावरचा मजकूरही सर्वांचे लक्ष वेधत आहे. त्यावर नाद करा... पण आमचा कुठं? असं लिहीलं आहे. शिवाय कुडाळ-मालवण मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मा. निलेशजी राणेसाहेब, आपणास प्रचंड विजयाच्या प्रचंड… प्रचंड … आणि प्रचंड शुभेच्छा! असा मजकूर लिहीला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये महामार्गालगत असलेल्या बांबर्डे गावात हे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामुळे हा बॅनर सध्या चर्चेला विषय ठरला आहे. या मतदार संघात निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक अशी थेट लढत होत आहे. या ठिकाणी लढत ही कमालीची चुरशीची होत आहे. या लढतीत कोण विजयी होणार हे आताच सांगता येत नाही. त्यामुळे वेगवेगळे आंदाज व्यक्त केले जात आहेत.
ट्रेंडिंग बातमी - निवडणुकीच्या निकालानंतर 48 तास का महत्त्वाचे? कशी असेल सत्ता स्थापनेची प्रक्रिया?
निलेश राणे यांच्या विजयासाठी नारायण राणे यांनी कुडाळ मालवणमध्ये तळ ठोकला होता.तर वैभव नाईक यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या होत्या. वैभव नाईक यांनी संपुर्ण मतदार संघ पिंजून काढला आहे. तर निलेश राणे यांनी ही गेल्या काही वर्षापासून कुडाळ मालवणमध्ये आपली ताकद वाढवली आहे. त्यामुळे या मतदार संघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.