Baramati Lok Sabha Elections 2024 Results : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारलीय. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वहिनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव केलाय. या निकालामुळे बारामतीवर शरद पवारांचंच वर्चस्व असल्याचं सिद्ध झालंय.
गेली अनेक वर्षे बारामती लोकसभा मतदार संघावर पवारांचे वर्चस्व प्रस्थापित आहे. 1984 साली शरद पवार पहिल्यादा या मतदारसंघातून निवडून गेले. 1989 ते 91 मध्ये इंदापूरचे शंकरराव पाटील (हर्षवर्धन पाटील यांचे चुलते) निवडून आले. आणि त्यानंतर 1991 साली अजित पवारांना संधी मिळाली पण राजकीय परिस्थितीत अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला आणि शरद पवारांनी 2009 पर्यत या मतदारसंघाचे नेतृत्व केलं. 2009 साली सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा सोडून शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले आणि निवडून आले. 2009 पासून सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार होत्या.
( नक्की वाचा : सांगलीतील 'भरकटलेलं विमान' दिल्लीत पोहोचलं; विशाल पाटलांचा मविआ, महायुतीला दणका )
2019 साली सुप्रिया सुळे यांच्या विजयात अजित पवार यांचा मोठा वाटा होता. पण, यंदा अजित पवार त्यांच्या काकांची साथ सोडून महायुतीत सहभागी झाले. इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. पण, आपल्या घरातील व्यक्तीला खासदार करण्यात अजित पवारांना पुन्हा एकदा अपयश आलंय. गेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता.
भावनिक प्रचाराचा होता बोलबाला
बारामती लोकसभा निवडणूक प्रामुख्याने विकास आणि भावनिक राजकारण या मुद्द्यांवर केंद्रीत होती. अजित पवारांनी स्वत: या मतदासंघावर लक्ष केंद्रीय केलं होतं. तर शरद पवारांना देखील जवळपास 8 मोठ्या सभा बारामती लोकसभा मतदारसंघात घेतल्या. दोन्ही पवारांनी या निवडणुकीत भावनिक प्रचार करत मतदारांना आवाहन केलं होतं.
( नक्की वाचा : सर्वाधिक जागा देणाऱ्या 2 मोठ्या राज्यात भाजपाला फटका का बसला? )
आधी म्हणजे मला खासदारकीला निवडून दिले. दुसऱ्यांदा वडिलांना (शरद पवार) निवडून दिले. मागील तीन टर्म लेकीला (सुप्रिया सुळे) निवडून दिले. आता सुनेकडे नेतृत्व आले की फिट्टमफाट होईल, असं अजित पवारांनी यावेळी म्हंटलं होतं. तर मूळ पवार आणि बाहेरुन आलेल्या पवारांमध्ये फरक आहे, असं त्यावर शरद पवारांनी उत्तर दिलं. सूनेत्रा पवार या बाहेरच्या पवार आहेत, हेच शरद पवारांनी यामधून सूचवलं होतं.
बारामती लोकसभा मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची आकडेवारी 61.7 टक्के होती. यावेळी ही आकडेवारी एकूण 59.50 टक्के आहे. या घसरलेल्या टक्केवारीचा कुणाला फायदा होणार याचीही सर्वांना उत्सुकता होती. हा फायदा सुप्रिया सुळे यांना झाल्याचं या निकालातून स्पष्ट झालंय.