आजपासून 29 वर्षांपूर्वी 1995 साली राज्यात पहिलं काँग्रेसेतर सरकार सत्तेवर आलं. शिवसेना-भाजपा युतीचं सरकार सत्तेत आलं. मनोहर जोशी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. युतीचं हे सरकार सत्तेत येण्यामध्ये त्यापूर्वीच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे यांचा मोठा वाटा होता. विधानसभा निवडणुकांपूर्वी मुंडे यांनी राज्यभर संघर्ष यात्रा काढून शरद पवारांना लक्ष्य केलं. गुन्हेगारी, भ्रष्टाचार, एन्रॉन करार यासारख्या मुद्यांवर मुंडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना टार्गेट केलं.राज्यात पहिल्यांदाच काँग्रेसनं सत्ता गमावली. गोपीनाथ मुंडे विरुद्ध शरद पवार (Gopinath Munde vs Sharad Pawar) यांच्यातील संघर्षाची ही सुरुवात होती.
1995 पासून पुढील जवळपास दोन दशकं गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार या महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांमध्ये कायम राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. शरद पवार यांच्या विरोधात राज्यात वातावरण निर्मिती करण्याचं काम सर्वाधिक सक्षमपणे करण्यात मुंडेंचं नाव आघाडीवर होतं. विशेषत: मराठवाड्यात आणि ओबीसी वर्गामध्ये शरद पवार यांचा प्रभाव कमी करण्यात गोपीनाथ मुंडेंचा मोठा वाटा होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंडे, पवार आणि पुतणे
गोपीनाथ मुंडे यांचा परळी हा विधानसभा मतदारसंघ सांभाळण्याची जबाबदारी ही धनंजय मुंडेंवर होती. 2009 साली गोपीनाथ मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. त्यांच्या जागेवर धनंजय मुंडेंना नाही तर पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली. पंकजा आमदार झाल्या. त्याचवेळी गोपीनाथ मुंडे यांचा वारसा कोण चालवणार हे त्यावेळी स्पष्ट झालं होतं. धनंजय मुंडे यांनी याच नाराजीतून भाजपा सोडली.
शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी त्यांच्याविरोधात बंड केलं. ते भाजपासोबत आले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा यांचा पराभव केलेले धनंजय मुंडे अजित पवारांच्या गटात असल्यानं भाजपा आणि पंकजा यांच्यासोबत आहेत. तर शरद पवारांना त्यांच्या राजकीय कारकीर्दीमधील सर्वात मोठी परीक्षा या लोकसभा निवडणुकीत द्यायची आहे. राज्यातील ही परीक्षा देत असताना बीडमध्ये मुंडेंच्या गडात पंकजा यांना रोखण्याचं आव्हान पवारांसमोर आहे.
( नक्की वाचा : शिंदेंच्या लेकीला फडणवीसांच्या 'रामा' चं आव्हान!)
भाजपाचा बालेकिल्ला
राज्यातील भाजपाचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघात बीडचा समावेश आहे. 1996 पासूनच्या आठ लोकसभा निवडणुकीत एक अपवाद वगळता भाजपाचा उमेदवार बीडमधून विजयी झाला आहे. सुरुवातीला जयसिंगराव गायकवाड, नंतर दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे आणि हल्लीच्या काळात प्रीतम मुंडे या भाजपाच्या खासदारांनी बीडचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं आहे.
2014 साली गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे पहिल्यांदा विजय मिळवला होता. त्या निवडणुकीत जवळपास 7 लाख मतांनी प्रीतम मुंडे विजयी झाल्या होत्या. 2019 साली हे मताधिक्य 1 लाख 68 हजारांवर आलं. प्रीतम मुंडे यांच्या विरोधात मागील निवडणूक लढवणाऱ्या बजरंग सोनावणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. भाजपानं प्रीतम यांच्या जागी त्यांच्या मोठ्या बहीण पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिलीय. तर मागील निवडणुकी बजरंग सोनावणे यांचा आधार असलेले धनंजय मुंडे हे यंदा पंकजा यांच्या बाजूनं आहेत.
( नक्की वाचा : साताऱ्यात 25 वर्षांमधील सर्वात मोठा बदल, पण परंपरा कायम राहणार का?)
मराठा विरुद्ध ओबीसी
पंकजा मुंडे यांचा राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांमध्ये समावेश होतो. मनोज जरांगे यांचं आंदोलन आणि त्याचे हिंसक पडसाद बीड जिल्ह्यात उमटले होते. मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान कार्यकर्त्यांवरील गुन्हे, मराठा विरुद्ध ओबीसी नेत्यांमधील वाद हे या निवडणुकीत निर्णायक ठरु शकतात.
पंकजांची परीक्षा
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपातील प्रमुख ओबीसी नेत्या म्हणून पंकजा यांचं नाव घेतलं जात होतं. 2014 साली देवेंद्र फडणवीस हे भाजापाचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यावेळी पंकजा यांची राज्यातील लोकप्रियता देखील वाढली होती. त्यावेळी 'मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे,' असं वक्तव्य त्यांनी केलं. आक्रमक स्वभावाच्या पंकजा यांचा भाजपाच्या नेतृत्त्वाशी नंतरच्या काळात अनेकदा संघर्ष झाला.
पंकजा यांच्यावर चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले. त्या प्रकरणात नेमण्यात आलेल्या SIT नं पंकजा यांना क्लीनचीट दिली. पण, त्यांची राजकीय प्रतिमा मलीन झाली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभूत व्हावं लागलं. या पराभवानंतर भाजपानं त्यांना केंद्रीय पातळीवर जबाबदारी मिळाली. पंकजा त्यामध्ये फारशा रमल्या नाहीत. त्यांची भाषणं आणि वेगवेगळी वक्तव्य कायम चर्चेत राहिली. या सर्व घटनाक्रमानंतरही भाजपानं पंकजा यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. नव्या राजकीय पिचवर पंकजा मुंडे यांची चांगलीच कसोटी लागणार आहे. तर भाजपाचा बालेकिल्ला असलेला हा बीडचा 'मुंडे गड' उद्धवस्त करण्याचं आव्हान शरद पवार यांच्यासमोर आहे.
कधी होणार मतदान?
बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. 4 जून रोजी निकाल जाहीर होईल.