भूपेंद्र आंबवणे, प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सोमवारी (4 नोव्हेंबर) संपणार आहे. अर्ज मागे घेण्यास मोजकाच कालावधी शिल्लक असताना महाविकास आघाडीतील मतभेद आहेत. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पूर्व मतदारसंघात महाविकास आघाडीतील बंडखोरी कायम आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे नाराज नेते भूपेश म्हात्रे यांनी शनिवारी (2 नोव्हेंबर) जोरदार शक्तीप्रदर्शन करत थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य केलं आहे.
भिवंडी पूर्वमधून महाविकास आघाडीकडून समाजवादी पक्षाच्या रईस शेख यांना उमेदवारी मिळालीय. त्यानंतर माजी आमदार आणि उबाठा पक्षाचे भिवंडी लोकसभा प्रमुख रुपेश म्हात्रे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरलाय. म्हात्रे समर्थकांनी शनिवारी केलेल्या शक्तीप्रदर्शनात उबाठा पक्षाचे शहर जिल्हा प्रमुख मनोज गगे,तालुका प्रमुख कुंदन पाटील, काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांच्यासह शिवसेना उबाठा, आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते उपस्थित होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'मुलासाठी आमचा बळी का?'
'कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना खासदार बनवण्यासाठी भिवंडीत आम्हाला कपिल पाटील यांचे काम करण्यास भाग पाडलं. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाची ताकद मोठी असताना सुद्धा चार पक्ष फिरून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी आम्ही काम केलं. प्रत्येक वेळेस आमचा बळी का म्हणून द्यायचा?
वरळीत उध्दव ठाकरे यांच्या मुलाला फायदा होईल म्हणून भिवंडीत समाजवादी पक्षाला शिवसेना पक्षाने समर्थन देऊन आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. आम्ही हा अन्याय सहन करणार नसून या निवडणुकीच्या मैदानात लढणार असा ठाम निर्धार म्हात्रे यांनी व्यक्त केला. मी कुणाला हरवण्यासाठी किंवा जिंकवण्यासाठी ही निवडणूक लढवत नसून मला जनतेच्या मदतीने ही निवडणूक जिंकायची आहे,' असा निर्धार म्हात्रे यांनी बोलून दाखवला.
( नक्की वाचा : रात्र थोडी, नाराजी फार! भाजपामधील असंतुष्टांना शांत करण्याचा काय आहे 'फडणवीस पॅटर्न'? )
काँग्रेस पदाधिकारीही उपस्थित
समाजवादी पक्षाचे उमेदवार रईस शेख यांनी 29 सप्टेंबर रोजी अर्ज दाखल केला. त्या शक्ती प्रदर्शानात काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे सहभागी झाले. परंतु आज रुपेश म्हात्रे समर्थकांनी आयोजित केलेला सभेला माजी खासदार सुरेश टावरे यांसह काँग्रेस पदाधिकारी सहभागी झाले होते.
सुरेश टावरे यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, 'समाजवादी पार्टीचे रईस शेख हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही त्यांच्यासोबत होतो. पण, त्यांचे पक्षप्रमुख अबू आझमी हे त्यानंतर भिवंडी पश्चिम विधानसभेत काँग्रेस उमेदवार दयानंद चोरगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असताना तेथे समाजवादी पक्षाच्या रियाज आजमी यांचा अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा आले होते. त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे आम्ही सुध्दा रुपेश म्हात्रे यांच्या सोबत राहणार आहोत.