लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यात मुंबईत राजकीय वातावरण तापताना दिसत आहेत. एकीकडे मुंबईत सभांचा धडाका सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. तर दुसरीकडे मुलंडमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या ऑफिसची तोडफोड झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ईशान्य मुंबईतील भाजपचे उमेदवारी मिहीर कोटेचा यांच्या ऑफिसची ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा संशय आहे. संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांनी मुलुंडमधील आपल्या ऑफिसची तोडफोड केल्याचा आरोप मिहीर कोटेचा यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी मिहीर कोटेचा यांनी मुलुंडमध्ये वॅार रूम उभारलं होतं. भाजपचे कार्यकर्ते आणि स्वत: मिहीर कोटेचा शिवाजी पार्क येथील सभेत व्यस्त असताना कोटेचा यांचं कार्यालय फोडण्यात आलं आहे.
(नक्की वाचा- महाराष्ट्राला नरेंद्र मोदींकडून 7 अपेक्षा, राज ठाकरेंनी त्यांच्यासमोरच बोलून दाखवल्या)
पैसे वाटप केल्याचा आरोप
ईशान्य मुंबईचे लोकसभेचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला. यावरुन भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. काही वेळ तणावाची स्थिती येथे निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
( नक्की वाचा- उद्धव ठाकरे म्हणतात, "नरेंद्र मोदी 4 जूननंतर पंतप्रधान राहणार नाहीत")
पोलिसांची प्रतिक्रिया
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याठिकाणी पैशांचं वाटप सुरु असल्याची आम्हाला तक्रार मिळाली होती. निवडणूक आयोगाच्या पथकाने याची तपासणी केली आहे. मात्र असा काही प्रकार सुरु असल्याची खात्रिलायक माहिती त्यांनी आम्हाली दिलेली नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.