महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याची सत्ता कोणाच्या ताब्यात जाणार हे स्पष्ट होईल. पण राजकीय पक्ष आपल्यापरीने किती जागा मिळणार याचे अंदाज बांधत आहेत. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही आपला अंदाज सांगितला आहे. निवडणूक निकाला आधी ते शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला आले होते. त्यावेळी ते पत्रकारांबरोबर बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत ही मोठं वक्तव्य केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्यात महायुतीचे सरकार येईल असं भाकीत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. शिवाय महायुतीला जवळपास 160 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. महायुतीचं सरकार आम्ही स्थापन करू. ते स्थापन करताना कोणाच्या मदतीची गरज लागेल असं वाटत नाही असं ही ते म्हणाले. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असंही त्यांनी सांगितलं. ज्या पद्धतीने प्रत्येक मतदार संघातून जो फिडबॅक येत आहे त्यावरून महायुतीची सत्ता येईल असं ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - 'सगळ्यांना माझी गरज लागते,पण...' विरारमधील राड्यानंतर हितेंद्र ठाकूर कोणा बरोबर?
मुख्यमंत्रिपदाचा निर्णय हा दिल्लीतून होईल. भाजपचे सर्व निर्णय हे दिल्लीत होत असतात. त्यामुळे मुख्यमंत्री कोण आणि कोणाचा हा निर्णयही दिल्लीतच घेतला जाईल असं ते म्हणाले. आमच्या सोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. त्यांची श्रद्धा नाही तर विश्वास दिल्लीवर आहेत. त्यामुळे ते ही चर्चेसाठी दिल्लीत येतील. मुंबईत कोणता निर्णय होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र मुख्यमंत्री कोण हे अजूनही ठरलेलं नाही असं ही त्यांनी सांगितलं.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांना अनेक प्रश्न अनेक वेळा पडत असतात. राऊत यांनीही मविआचाच मुख्यमंत्री होईल असा दावा केला आहे. तो दावा चंद्रकांत पाटील यांनी खोडून काढला आहे. आता सत्ता कोणाची येणार याचे उत्तर उद्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. पण राज्यात सध्या कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे हे नक्की.