सोमवारी संध्याकाळी विधानसभेचा प्रचार संपला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पण नरखेड इथली प्रचार सभा आटोपून काटोलकडे येत होते. त्याच वेळी त्यांच्यावर बेला फाटा इथे हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्यात ते जखमी झाले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्याचे व्हिडीओ आणि फोटोही समोर आले. त्यानंतर त्यांना काटोल ग्रामिण रूग्णालयात नेण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचारही करण्यात आले. मात्र त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत भाजप नेत्या आणि आमदार चित्रा वाघ यांना थोडं वेगळं वाटतय. त्यांनी काही फोटो समोर आणले आहेत. ते फोटो दाखवत त्या मला काहीही म्हणायचे नाही, असं सांगत या हल्ल्याबाबत एक प्रकारे संशय निर्माण करताना दिसत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चित्रा वाघ यांनी हल्ला झाल्यानंतरचे काही फोटो समोर आणले आहेत. फोटो दाखवत बोनेटवर दगड आहे. बोनेटला काहीच झालेले नाही. अनिल देशमुख यांनाही कुठली जखम नाही. एक व्यक्ती फोटो काढत आहे, झूम केल्यास तो आरशात दिसेल. असं चित्रा वाघ म्हणत आहेत. त्यानंतर त्या पुढे म्हणतात, मला काहीही म्हणायचे नाही. समझनेवाले समझ गए! असंही त्या शेवटी म्हणतात. त्यांनी एक प्रकार या हल्ल्याबाबत संशय निर्माण केला आहे. खरोखरच हा हल्ला झाला आहे का की हा एक ड्रामा आहे असं तर वाघ यांना म्हणायचं नाही ना याची जोरदार चर्चा आहे.
ट्रेंडिंग बातमी - "माझी चूक झाली, मला इथून सोडवा, विनोद तावडेंचा फोन", हिंतेंद्र ठाकूरांचा दावा
अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यानंतर त्यांना तातडीने स्थानिक रूग्णालयात नेण्यात आले. त्यानतंर रात्री मॅक्स रुग्णालय दाखल करण्यात आलं. न्यूरोसर्जन डॉ.आदित्य अटल यांनी त्यांची तपासणी केली. तसेच मेंदूचे सिटीस्कॅनमध्ये परिणाम सामान्य आले आहेत. शिवाय त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं मेडिकल बुलेटिनमधून सांगण्यात आले आहे. रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांच्या कपाळावर जखम होती. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
हल्लाझाल्यानंर या घटनेचा निषेध महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता. भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली आहे. गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुखांवरील हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तर ही सर्व स्टंटबाजी असल्याचा आरोप भाजपने केला आहे.