नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी पाच लाखांच्या अंतराने जिंकून येतील असा दावा भाजपतर्फे केला जात होता. मतमोजणीला महिना शिल्लक असताना भाजपतर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू झाली आहे. यंदाचं मतदान गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी म्हणजे 54.30 टक्के झालं आहे. ही बाब भाजपने गांभीर्याने घेतली आहे. जिथे गडकरींचा पाच लाखावर मतांनी विजय होईल, असे दावे केले जात होते, त्याच नागपूरातील लाखो मतदारांची नावे मतदारयादीतून गहाळ झाली आणि परिणामी लाखो लोक मतदान करू शकले नाही. आता त्या मुद्द्यावरच भारतीय जनता पक्षाच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पक्षाला आधी देण्यात आलेली मतदार यादी पेक्षा फार वेगळी मतदार यादी मतदानाच्या दिवशी नागपुरातील मतदान केंद्रांवर देण्यात आली होती आणि या बूथवर पुरविण्यात आलेल्या यादीत खूप चुका होत्या, खूप नावे गहाळ होती, असा थेट आरोप विदर्भ भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेत पूर्व नागपूर येथील आमदार कृष्णा खोपडे यांनी एनडीटीव्ही मराठी सोबत बोलताना केला आहे. मतदार यादीतील चुकांमागे सरळसरळ राजकीय षडयंत्र असल्याचा खळबळजनक आरोप देखील त्यांनी केला आहे.
नक्की वाचा - रायगड कोण सर करणार? गिते-तटकरेंसाठी प्रतिष्ठेची लढाई
नागपूर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरींविरोधात विकास ठाकरे...
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर लोकसभेचं मतदान पार पडलं आहे. येथे महायुतीकडून नितीन गडकरी आणि महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे विकास ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विकास ठाकरे यांची मतदारसंघात चांगली पकड असल्याने त्यांनी स्थानिक पातळीवर मोठा प्रचार केला आहे. त्यात ओबीसी, दलितांचं एकगठ्ठा मतदान विकास ठाकरेंना गेल्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नितीन गडकरांना याचा मोठा फटका सहन करावा लागू शकतो. त्यामुळे नितीन गडकरी पाच लाखांच्या अंतराने जिंकून येतील असा भाजपकडून केलेला दावा फोल ठरू शकतो.