जाहिरात
This Article is From May 01, 2024

रायगड कोण सर करणार? गिते-तटकरेंसाठी प्रतिष्ठेची लढाई

रायगड कोण सर करणार? गिते-तटकरेंसाठी प्रतिष्ठेची लढाई
रायगड:

रायगड म्हणजे पुर्वीचा कुलाबा लोकसभा मतदार संघ. बॅ. ए. आर अंतूले यांनी या मतदार संघाचे नाव बदलून रायगड केले. कधी काँग्रेस तर कधी शेकाप तर कधी शिवसेनेला साथ देणारा हा मतदार संघ राहीला आहे. कोणत्याही लाटेला आहारी न जाता आपला खासदार निवडून देणारा हा मतदार संघ म्हणूनही त्याची ओळख आहे. सी. डी देशमुख, दि. बा. पाटील, ए, आर. अंतूले या सारख्या दिग्गजांना या मतदार संघाने आपला प्रतिनिधी म्हणून लोकसभेत पाठवले होते. मतदार संघ पुनर्रचनेत हा मतदार संघ विभागला गेला. रत्नागिरी जिल्ह्यातील दोन आणि रायगड जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघ मिळून रायगड लोकसभा तयार झाला आहे. या मतदार संघात यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गिते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल तटकरे यांच्यात सामना रंगत आहे. सलग तिसऱ्यावेळी हे दोघे एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत. दोघांनीही एकमेकाला एकएक वेळा पराभव केला आहे. तटकरेंनी पुन्हा एकदा विजयासाठी कंबर कसली आहे तर गितेंनी मतदार संघ पिंजून काढत पराभवाचा वचपा घेण्यासाठी चंग बांधला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

गिते विरूद्ध तटकरे पुन्हा लढत 

रायगड लोकसभेत माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते विरूद्ध सुनिल तटकरे  यांच्यात पुन्हा एकदा लढत होत आहे. 2014 साली गिते यांनी सुनिल तटकरे यांच्यावर निसटता पराभव केला होता. हा पराभव तटकरेंच्या जिव्हारी लागला होता. अगदी शेवटच्या फेरीपर्यंत तटकरे यांनी गितेंना टक्कर दिली होती. अखेर दोन हजाराच्या फरकाने त्यांना पराभव स्विकारावा लागला. विशेष म्हणजे या निवडणुकीत सुनिल तटकरे नावाच्या अजून एका उमेदवाराला दहा हजाराच्या घरात मतदान झाले होते. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गिते यांचा तटकरे यांनी दणदणीत पराभव करत मागिल पराभवाची परतफेड केली होती. आता 2024 च्या निवडणुकीतही हेच दोघे एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत. 

हेही वाचा - मावळातून श्रीरंग बारणे हॅटट्रिक मारणार? की संजोग वाघेरे मशाल पेटवणार?

गितेंचे कुणबी कार्ड चालणार?  

रायगडमध्ये अनंत गितेंच्या विजयासाठी उद्धव ठाकरेंनी ताकद लावली आहे. निवडणुक जाहीर होताच त्यांनी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मेळावे घेऊन वातावरण निर्मिती केली होती. त्यामुळे महायुतीच्या गोटात हा मतदार संघ कोणाकडे जाणार यावरच घोडे असले होते. त्यावेळी गितेंनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला होता. गिते हे कुणबी समाजाचे आहेत. या समाजाची मोठी संख्या या मतदार संघात आहे. त्याचा फायदा गितेंना होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय तटकरे हे भाजपकडे गेल्याने मतदार संघातील मुस्लिम मतदार हा नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा मतदार गितेंकडे वळल्यास मोठा फटका तटकरेंना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. रायगडमधील अलिबाग, पेण आणि श्रीवर्धन या मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाची ताकद मोठी आहे. ही ताकद गितेंना मिळाली तर त्यांचे बळ नक्कीच वाढणार आहे. शेकाप सध्या महाविकास आघाडीचा घटक आहे. हीबाब गितेंसाठी सकारात्मक समजली जाते.   

Latest and Breaking News on NDTV

तटकरेंना शिंदे भाजपची साथ 

रायगड लोकसभेत शिंदे गटाचे तीन आमदार आहे. तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे. त्यामुळे सहा पैकी पाच आमदार हे महायुतीचे आहेत. त्यामुळे तटकरेंसाठीही दिलासा देणारी बाब आहे. मात्र मविआ सरकारमध्ये तटकरे विरूद्ध शिवसेनेचे आमदार जाहीर पणे वक्तव्य करत होते. त्यामुळे ती कटूता संपली आहे की नाही हा विषय तटकरेंसाठी डोकेदुखीचाही ठरू शकतो. शिवसेनेचा आमदार भरत गोगावले यांनी तटकरें विरोधात थेट भूमिका घेतली होती. शिवाय भाजप बरोबर सलोखा केल्याने मोठ्या संख्येने असलेले मुस्लिम मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकणार यावरही तटकरेंचे भवितल्य अवलंबून असेल. मनसेही महायुतीचा भाग आहे. पण रत्नागिरीतल्या मनसैनिकांचा तटकरेंच्या नावालाच विरोध केला होता. याकडेही दुर्लक्ष करून चालणारे नाही. पण तटकरेंचे स्वत: चे एक नेटवर्क आहे. कार्यकर्त्यांना हाताळण्याची कसब आहे. संघटन कौशल्य आहे. या जोरावर त्यांनी शिंदेंच्या आमदारांबरोबर जुळवून घेतल्याचे सध्या तरी दिसत आहेत. त्याचा फायदा मतात होतो की नाही हे मात्र निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.       

Latest and Breaking News on NDTV

रायगडमध्ये कोणाची किती ताकद? 

रायगड लोकसभेत रायगडमधील पेण,अलिबाग,श्रीवर्धन आणि महाड हे चार मतदार संघ येतात. तर रत्नागिरी जिल्ह्यातील दोपोली आणि गुहागर हे मतदार संघांचा समावेश होतो. पक्षीय बलाबल पाहीले असता महाड, दापोली आणि अलिबाग मतदार संघात शिंदे गटाचे आमदार आहेत. तर श्रीवर्धनमध्ये आदिती तटकरे या स्वत: आमदार आहे. पेणमध्ये भाजपचे आमदार आहे. तर गुहागरमध्ये ठाकरे गटाचे भास्कर जाधव आमदार आहे. त्यानुसार महायुतीच्या ताब्यात पाच मतदार संघ आहे. तर आघाडीच्या ताब्यात एकच मतदार संघ आहे. त्यात महाडमध्ये माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप या ठाकरेंच्या शिवसेनेत आल्या आहेत. ही बाबत ठाकरेंसाठी दिलासा देणारी ठरली आहे. 

मतदार संघ                        आमदार                        पक्ष 

पेण                                 रवी पाटील                     भाजप 

अलिबाग                          महेंद्र दळवी                  शिवसेना ( शिंदे गट ) 

श्रीवर्धन                            आदिती तटकरे              राष्ट्रवादी काँग्रेस 

महाड                              भरत गोगावले               शिवसेना ( शिंदे गट ) 

दापोली                            योगेश कदम                 शिवसेना ( शिंदे गट ) 

गुहागर                             भास्कर जाधव              शिवसेना ( ठाकरे गट ) 


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com