मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना NDA मध्ये आणण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरु

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी NDA मध्ये परत यावं यासाठी भाजपाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
उद्धव ठाकरे यांनी 2019 साली भाजपाची साथ सोडली होती.
मुंबई:

रौनक कुकडे, विकास भदोरिया, प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचे निकाल (Lok Sabha Elections Result 2024) लागल्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगानं घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भाजपाच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्विकारलीय. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवलीय. त्यापाठोपाठ आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी NDA मध्ये परत यावं यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. एका केंद्रीय मंत्र्याकडं उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलीय. NDTV ला सूत्रांनी ही बातमी दिली आहे.

भाजपा आणि शिवसेना यांची महाराष्ट्रात 25 वर्षांपेक्षा जास्त युती होती. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर  ही युती तुटली.  उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अडीच वर्षांनी शिवसनेत फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आमदारांचा मोठा गट शिवसेनेतून बाहेर पडला. भाजपाच्या पाठिंब्यावर सध्या एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत.

( नक्की वाचा : 'मला सरकारमधून मोकळं करावं', देवेंद्र फडणवीस यांची मागणी )

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचा मोठा पराभव झाला. भाजपाला फक्त 9 जागा मिळाल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षानंही 9 जागा जिंकल्या. लोकसभा निवडणुकीत भाजपाची देशभरातही पिछेहाट झाली. त्यांचं संख्याबळ 303 वरुन 240 वर घसरली. एनडीएला 292 जागा मिळाल्या.

( नक्की वाचा : BJP स्पष्ट बहुमतापासून दूर, PM मोदींना करावा लागणार 5 मोठ्या आव्हानांचा सामना )

 या निवडणूक निकालानंतर भाजपानं नव्या मित्र पक्षांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरेंना परत एनडीएमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. एका केंद्रीय मंत्र्याला याची जबाबदारी देण्यात आलीय, असं सूत्रांनी सांगितलंय. 

शिवसेना आणि राष्ट्रवादीची प्रतिक्रिया काय?

उद्धव ठाकरेंना NDA मध्ये परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत ही चर्चा सुरु होताच त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही शक्यता फेटाळून लावलीय. 'मी उद्धव ठाकरे यांना कालच भेटलो आहे. 2024 मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येईल, यासाठी ते कामाला लागले आहेत. तुम्ही बोलताय तशी सुतराम शक्यता मला वाटत नाही,' असं पाटील यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितलं.

Advertisement

तर, सध्या अफवांचा बाजार गरम आहे. त्यावर विश्वास ठेवू नका, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी दिलीय. 


 

Topics mentioned in this article